श्री. रामचंद्र पांगुळ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पू. गुरुनाथ दाभोलकर यांचे आशीर्वाद लाभणे
१. वाढदिवसानिमित्त पू. गुरुनाथ दाभोलकरकाका यांनी साधकाला आशीर्वाद देणे
‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीचे दर्शन घेऊन येत असतांना आश्रमाच्या व्हरांड्यामध्ये (पोर्चमध्ये) सनातन संस्थेचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकरकाका (वय ८४ वर्षे) सूर्य देवतेला नमस्कार करून प्रदक्षिणा पूर्ण करत असल्याचे मला दिसले. मी त्यांना समोर दिसलो. तेव्हा मी त्यांना नमस्कार केला आणि जवळ जाऊन ‘‘आज माझा वाढदिवस आहे. मला आशीर्वाद द्यावेत’’, अशी त्यांना प्रार्थना केली. लगेचच पू. काकांनी माझ्यासाठी ‘शतायुष्य, निरोगी शरीर आणि गुरूंच्या सेवेत सतत रहाता येऊ दे’, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करून मला जवळ घेतले.
२. पू. गुरुनाथ दाभोलकरकाका यांनी साधकासाठी देवाकडे कळकळीने प्रार्थना करणे
त्यानंतर मी त्यांच्या खोलीमध्ये गेलो. पू. काका मला म्हणाले, ‘‘आता आपण तुमच्यासाठी खाऊ इत्यादी काही देणार नाही. आपण देवाकडे उभे राहून तुझ्यासाठी प्रार्थना करणार’’, असे म्हणून त्यांनी मला त्यांच्या खोलीमध्ये असलेल्या देवघरासमोर उभे रहाण्यास सांगितले. तेसुद्धा तेथे उभे राहिले. त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर माझ्यासाठी प्रार्थना केली. त्यांचे काही बोल मला स्पष्ट ऐकू आले. त्यांनी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्या छायाचित्रासमोर उभे राहून ‘राम यांना चांगले आरोग्य मिळू द्या. त्यांची ईश्वरप्राप्तीची तळमळ वाढू द्या. गुरुकार्य त्यांच्याकडून होऊ द्या आणि ३ – ४ वर्षांत संतपदाला प्राप्त करून घ्या’, अशी प्रार्थना केली.
३. पू. दाभोलकरकाका यांच्या कळकळीच्या प्रार्थनेमुळे श्रीकृष्ण आशीर्वाद देत असल्याचे साधकाला जाणवणे
त्यांची प्रार्थना इतकी कळकळीची होती की, जणू काही ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण ती ऐकून घेत आहे आणि मला आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवत होते. त्या वेळी माझीही पुष्कळ भावजागृती झाली. मला काही वेळ काही सुचतच नव्हते. तेव्हा मला पुष्कळ आनंद जाणवत होता.
४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यासाठी किती करतात !’, या विचाराने कृतज्ञता वाटणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले संतांच्या माध्यमातून मला सत्संग देत आहेत’, याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. शेवटी पू. काकांनी त्यांच्याकडे असलेला गोड खाऊ मला दिला. मी कृतज्ञता व्यक्त करून पुढील सेवेसाठी गेलो. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव माझ्यासाठी किती करतात !’, या विचाराने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– श्री. रामचंद्र दगडू पांगुळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |