प्रेमळ आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणारे ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक श्री. योगेश जलतारे (वय ४९ वर्षे) !
‘आषाढ कृष्ण प्रतिपदा (२२.७.२०२४) या दिवशी ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक श्री. योगेश जलतारे यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पुणे येथील सौ. स्नेहल पाटील (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २७ वर्षे) यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. योगेश जलतारे यांना ४९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. नम्रता
‘२४ ते ३०.६.२०२४ या कालावधीत फोंडा, गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’ येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये गुरुकृपेने मला सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा श्री. योगेश जलतारे यांच्याशी सेवेनिमित्त माझा संपर्क आला. दादा अत्यंत नम्रतेने आणि न्यूनता स्वीकारून सर्वांशी बोलतात.
२. विचारण्याची वृत्ती
दादांना सेवेचा पुष्कळ अनुभव असूनही ते प्रत्येक सूत्र विचारून घेतात.
३. निरागसता
योगेशदादांमध्ये बालकभाव जाणवतो. ते सेवा करतांना लहान बालकाप्रमाणे सहज आणि निरागस असतात.
४. जवळीक साधणे
दादा सर्व साधकांशी सहजतेने जवळीक साधतात. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या कालावधीत साधक रात्री उशिरापर्यंत सेवा करत होते. दादा रात्री सेवा झाल्यावर सर्व साधकांना भेटूनच विश्रांती घेण्यासाठी जात असत.
५. प्रेमभाव
अ. या कालावधीत साधकांना संगणकीय सेवा अधिक घंटे करावी लागते. दादा आम्हाला मधून मधून स्वत:ची काळजी घेण्याविषयी आणि महाप्रसाद घेण्याची प्रेमाने आठवण करून देत होते.
आ. एक दिवस मी एक सेवा करण्यासाठी गेले. तेथे योगेशदादांनी मला या ‘सेवेचे स्वरूप, नियोजन आणि ‘सॉफ्टवेअर’ यांविषयी प्रेमाने समजावून सांगितले. त्यामुळे मला कोणताही ताण आला नाही.
६. इतरांचा विचार करणे
एकदा योगेशदादांनी मला विचारले, ‘‘तू रात्री किती वाजेपर्यंत सेवा करू शकतेस ?’, तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी रात्री उशिरापर्यंत जागून सेवा करू शकते. मी नंतर महाप्रसाद घेऊ शकते.’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही वेळेत महाप्रसाद घेऊन या. स्त्री मुळातच सोशिक आहे. कुटुंबातील सर्वांचे जेवण झाल्यावर आवरणे इत्यादी करून मगच तुम्ही जेवता. तुम्हा सर्वांना माझे नमन !’’ हे म्हणत असतांना त्यांनी हात जोडून वाकून नमस्कारही केला. दादांमधील ही ‘नम्रता अणि स्त्रियांप्रती आदरभाव’ पाहून माझी भावजागृती झाली.
७. ‘साधकांकडून गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा व्हावी’, अशी तळमळ असणे
एक दिवस योगेशदादांनी मला एका चित्रीकरणामध्ये परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितलेल्या सुधारणा दाखवल्या. त्या वेळी ‘प्रत्यक्ष श्री गुरु कसे घडवतात !’, याविषयी दादा मला सांगत होते. त्या वेळी ‘आम्हाला गुरुदेवांचे चैतन्य मिळून आम्हा साधकांकडून परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा व्हावी’, अशी दादांची तळमळ लक्षात आली.
८. साधकांना प्रोत्साहन देणे
एकदा दादा आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही तरुण आहात. छान सेवा करा. आम्ही तुमच्या वयात एवढी सेवा केली नाही.’’ खरेतर दादाही झोकून देऊन सेवा करत आहेत.
९. ‘गुरुसेवेत चूक होऊ नये’, यासाठी साधकांना सहजतेने चुका सांगणे
दादा साधकांना सेवेतील चुका सहजतेने सांगतात. त्यांनी मला एप्रिल २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यात झालेल्या ‘सनातन गौरव दिंडी’च्या चित्रीकरणातील चुका आणि पुढच्या वेळी चांगले कसे करू शकतो’, याविषयी समजावून सांगितले. ‘गुरुसेवेत कुठलीही चूक व्हायला नको’, अशी त्यांची तळमळ जाणवली.
१०. साधकांप्रती कृतज्ञताभाव असणे
आम्ही ध्वनीचित्रीकरणाशी संबंधित सेवा करणारे सर्व साधक अन्य जिल्ह्यांतून आलो होतो. ‘प्रत्येक साधक नोकरी आणि व्यवसाय सांभाळून सेवा करत आहे’, याबद्दल योगेशदादा पुष्कळ कौतुकाने सर्वांना सांगत होते. प्रत्येक साधकांप्रती त्यांच्या मनात असलेला कृतज्ञताभाव मला जाणवला.
११. अल्प अहं
योगेशदादा ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक आहेत; पण त्यांच्या वागण्या-बोलण्यात कोणताही अहं जाणवत नाही.
१२. संतांप्रती भाव
‘पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४२ वर्षे) साधकांना कशा प्रकारे घडवत आहेत’, याविषयी आम्ही बोलत होतो. तेव्हा योगेशदादांचे हात आपोआप जोडले गेले. त्यांच्या मनात संतांप्रती अपार भाव आहे.’
– सौ. स्नेहल केतन पाटील (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २७ वर्षे), पुणे (१२.७.२०२४)