सेवेची तीव्र तळमळ असणार्‍या आणि सर्वांना आपलेसे करणार्‍या पुणे येथील पू. (सौ.) मनीषा पाठक (वय ४२ वर्षे) !

‘पुणे येथील पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या सान्निध्यात सेवा करतांना साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेली अनुभूती येथे दिली आहे.

पू. (सौ.) मनीषा पाठक

१. सर्वांना आपलेसे करणे 

सौ. स्नेहल पाटील

‘पू. (सौ.) मनीषाताईंच्या संपर्कात जी व्यक्ती येते, ती त्यांचीच होऊन जाते. एखादे बाळ आपल्या आईला मनातील सर्वकाही सांगते, तसे साधकच नव्हे, तर जिज्ञासू आणि धर्मप्रेमीसुद्धा पू. (सौ.) ताईंना मनातील सर्वकाही सांगतात.

२. सेवेची तीव्र तळमळ

अ. ‘पू. (सौ.) मनीषाताईंना अनेक शारीरिक त्रास होत असतात, तरीही त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन साधक, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात.

आ. ‘पुणे जिल्ह्यात होणार्‍या प्रत्येक उपक्रमात साधकांच्या समवेत जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनीही पुढाकार घेऊन सेवा करावी’, यासाठी पू. (सौ.) ताई अतिशय तळमळीने प्रयत्न करतात.

इ. राज्यस्तरीय मंदिर परिषद, सनातन गौरवदिंडी आणि आंदोलने, अशा विविध उपक्रमांत ‘नवीन साधक घडावेत’, असा पू. ताईंचा सतत ध्यास असतो.

ई. या वर्षीही पू. ताईंनी अनेक नवीन साधकांना ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सेवेला जाऊ शकता का ?’, असे विचारून त्यांच्या सेवेचे नियोजन केले.

उ. ‘सर्व उपक्रमांत नवीन साधकांची फळी सिद्ध व्हावी’, यासाठी पू. ताई साधकांच्या स्थितीला जाऊन त्यांना सेवा समजावून सांगतात आणि त्यांना पुढाकार घेण्यास शिकवतात.

ऊ. सर्व साधकांना पू. (सौ.) ताई ‘समष्टी सेवेला व्यष्टी साधनेची जोड कशी द्यायची’, याविषयी तळमळीने सांगतात.

ए. ‘प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) हे बीज रोवले आहे. मागील २५ वर्षांत याचा वटवृक्ष झाला. आता आपल्याला हा वृक्ष अजून वाढवायचा आहे’, असे त्या आम्हा साधकांना नेहमी सांगतात.

३. साधकांमध्ये संघभाव निर्माण करणे

एखादा साधक कुणाविषयी त्याच्या माघारी काही बोलत असल्यास त्या लगेच त्याला थांबवतात आणि ‘साधकांमधील गुण कसे पहायचे’, हे त्याला सांगतात. यामुळे साधकांचे मन निर्मळ होण्यास साहाय्य होते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये संघभावही वाढला आहे.

४. एकाच वेळी अनेक सेवा करणे 

आपण एका वेळी एकच सेवा करत असतो; पण पू. (सौ.) ताईंची आकलनक्षमता आणि समष्टीसाठीची तळमळ अनाकलनीय आहे. त्या एका वेळी २ भ्रमणभाषवर २ सत्संग घेतात. एका सत्संगात बोलतांना ‘दुसर्‍या सत्संगातील साधक काय बोलले’, हेसुद्धा त्यांना लगेच आकलन होते आणि त्या त्यांना लगेच प्रतिसादही देतात. त्याच वेळी त्या अन्य साधकाच्या भ्रमणभाषवरून तातडीचा निरोपही देतात. एकाच वेळेला ३ – ४ सेवांची सूत्रे हाताळणे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

५. अहं अल्प असणे

५ अ. पू. (सौ.) मनीषाताई स्वतः संत असूनही सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कृती तळमळीने करून सर्व सेवा पूर्ण करतात.

५ आ. स्वतःचे वेगळेपण न जपणे : पू. ताई पुण्यातील विविध केंद्रांमध्ये जातांना रिक्शा किंवा ‘मेट्रो’ने जातात. ‘त्यांना चारचाकीने नेण्यासाठी साधकांचा वेळ जाऊ नये’, असे त्यांना वाटते. संपर्क, दौरा किंवा अन्य केंद्रात जातांना ‘पू. ताईंसमवेत कुणी जावे’, असेही त्यांचे नसते. त्या एकट्या किंवा कधी त्यांच्या मुलीला कु. प्रार्थना (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) हिला समवेत घेऊन जातात. त्या जातांना समवेत सर्व साहित्य आणि साधकांसाठी खाऊ घेऊन जातात. ‘मी संत आहे’, असे कोणतेही वेगळेपण त्या जपत नाहीत. यातून ‘त्यांचा अहं किती अत्यल्प आहे’, हे मला शिकायला मिळते.

५ इ. त्या संत असूनही साधकांची क्षमा मागतात, ‘मी अल्प पडते’, असे त्या म्हणतात. पू. ताई सेवेतील सूत्रे साधकांना विचारून पूर्ण करतात.

६. अनुभूती

पू. (सौ.) ताई एकदा सत्संगात बोलत असतांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळच बोलत आहेत’, अशी अनुभूती साधकांना आली.’

– सौ. स्नेहल पाटील (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २७ वर्षे), पुणे (२४.६.२०२४)