विविध सेवांच्या माध्यमातून गुरुकृपेची अनुभूती घेणार्या बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे) !
बेंगळुरू (कर्नाटक) येथील श्रीमती पूर्णिमा प्रभु यांनी त्यांच्या साधनेला केलेला आरंभ आणि केलेल्या सेवा यांविषयी त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा यांविषयी जाणून घेत आहोत. यातील काही भाग आपण २० जुलै या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/815960.html
(भाग २)
७. विविध उपक्रमांच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करणे
‘मी वर्ष १९९९-२००० मध्ये माझी बहीण सुरेखा हिच्या घरी रहायला गेले. दुसर्याच दिवशी तिच्या घरी एक नातेवाईक आल्या. सुरेखाने त्यांना नामजपाविषयी सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या घरच्या मालकांना सत्संग पुष्कळ आवडतो. ते धार्मिक आहेत.’’ दुसर्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो. तेथे गेल्यावर आमची जुनी ओळख असल्याप्रमाणे त्यांनी आमचे स्वागत केले आणि लगेच सत्संग चालू झाला. त्या सत्संगात सौ. राणी नावाच्या आणखी एक साधिका येत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या घरी मोठा ‘हॉल’ आहे. तिथे सत्संग चालू करूया.’’ त्यांनी त्यांच्या घरातील ‘हॉल’ सनातन संस्थेला वापरायला दिला.
‘जवळच्या श्रीराममंदिरात ग्रंथप्रदर्शन, शाळेत प्रश्नमंजुषा, शिक्षकांसाठी प्रवचन, ‘सनातन प्रभात’ वर्गणीदार मोहीम’ इत्यादी उपक्रम राबवण्यात आले. जवळपासच्या बेकरीज् आणि दुकाने येथे अन् घराघरांत ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले. ‘सनातन’ म्हणून आमची ओळख झाली. आम्ही आजूबाजूच्या मंदिरांतही ग्रंथप्रदर्शन लावू लागलो आणि त्या ठिकाणी चांगला प्रसार चालू झाला.
८. अधिकोष आणि मोठी आस्थापने येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर प्रवचन करणे
बेंगळुरू येथे मी आणि सुरेखाने ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, एल्.आय.सी., म्युच्युअल फंड आणि स्टेट मैसूर सँडल सोप फॅक्टरी’, या ठिकाणी ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर प्रवचन करून उपस्थितांना साधनेचे महत्त्व सांगितले. उपस्थितांनी सनातनचे ग्रंथ घेतले. काही जण नंतर नियमित वर्गणीदार झाले.
९. कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने सौ. सुधा सदानंद यांना अनुभूती येणे आणि त्यांनी त्यांचे तळघर संस्थेला वापरायला देणे
जानेवारी २००० मध्ये सुरेखाताईंचे पती डॉ. राजेंद्र केणी यांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही सौ. सुधा सदानंद यांना भेटायला गेलो. सौ. सुधा योगवर्ग घेतात. त्यांनी हसतमुखाने आमचे स्वागत केले. साधना आणि कुलदेवतेचे नामस्मरण यांविषयी सांगितल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी श्रीरामभक्त आहे आणि त्याचेच नामस्मरण करते. मी दुसरे कुठलेच काही करत नाही.’’
नेमकी त्याच दिवशी त्यांना एक मोठी अनुभूती आली. त्यांचे यजमान बाहेर गेले होते. त्यांना काहीतरी अडचणी आल्या होत्या. त्यांचा भ्रमणभाष लागत नव्हता. पुष्कळ वेळ झाला, तरी ते घरी आले नव्हते. सौ. सुधा काळजी करत बसल्या होत्या. इतक्यात त्यांना कुलदेवतेच्या नामस्मरणाविषयी आठवले आणि त्यांनी कुलदेवतेचा नामजप चालू केला. थोड्या वेळात त्यांच्या यजमानांचा भ्रमणभाष आला आणि त्यांनी ‘मी सुखरूप आहे. काळजी करू नकोस’, असे सौ. सुधा यांना सांगितले. तेव्हा त्यांना ‘कुलदेवता साहाय्याला धावून येते’, याची प्रचीती आली. त्यांनी संस्थेला त्यांचे तळघर (बेसमेंट) वापरायला दिले.
९ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री. सदानंद यांचे केलेले कौतुक ! : वर्ष २००५ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले बेंगळुरूला आले होते. तेव्हा ते सौ. सुधा सदानंद यांच्या घरी राहिले होते. सौ. सुधा यांचे पती श्री. सदानंद प्रतिदिन सकाळी उठून मनोभावे पूजा करतात. गुरुदेवांनी त्यांचे देवघर बघितले आणि ‘ते पुष्कळ सात्त्विक वाटते’, असे सांगितले.
१०. माहिती आणि तंत्रज्ञान यांसंदर्भातील प्रदर्शनात लावलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळणे
माझे एक नातेवाईक प्रशासकीय अधिकारी (IAS Officer) होते. त्यांना कर्नाटकमध्ये नवीन चालू झालेल्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव (आय.टी. डिपार्टमेंटचे सेक्रेटरी) म्हणून नेमले होते. वर्ष २००० मध्ये बेंगळुरू येथे प्रथमच माहिती आणि तंत्रज्ञान यांसंदर्भातील मोठे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. मी माझ्या नातेवाइकांना सहज म्हटले, ‘‘या प्रदर्शनात आम्हालाही एक विनामूल्य कक्ष द्या.’’ तेव्हा त्यांनी प्रयत्न करून ग्रंथप्रदर्शनासाठी एक विनामूल्य कक्ष दिला. सगळीकडे या प्रदर्शनाविषयी मोठी चर्चा होती. अशा प्रदर्शनामध्ये कक्ष मिळाला आणि सेवेची संधी लाभली; म्हणून सगळे साधक आनंदात होते. हे प्रदर्शन ४ दिवस होते.
पहिल्यांदाच मला ‘ग्रंथप्रदर्शन आणि साधकांची सेवा यांचे नियोजन कसे करायचे ?’, हे शिकायला मिळाले. तेव्हा मैसुरू, तुमकुरू आणि कुणिगल येथून सेवेसाठी साधक आले होते. मला सगळ्या साधकांना भेटण्याची संधी मिळाली आणि देवाने भरभरून आनंद दिला. लोकांची एवढी गर्दी झाली की, आम्हालाच उभे रहायला जागा नव्हती. ग्रंथप्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद बघून सगळ्यांना आश्चर्य वाटत होते आणि आनंदही होत होता.’ (क्रमशः)
– श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६५ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक. (२७.६.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |