रामनाथी आश्रमातील श्री. अविनाश जाधव यांनी गुरुचरणी केलेले आत्मनिवेदन
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधक २५ वर्षे साधनेत तग धरून असणे
‘प.पू. डॉक्टरांनी मला साधनापथावर आणले, ते वर्ष १९९८-९९ या कालावधीत. त्या वेळी मी गुरुदेवांकडे पाहिले आणि ‘माझे उद्धारकर्ते हेच आहेत’, याचा त्यांनी माझ्या मन:पटलावर संदेश उमटवला. त्याच क्षणी मी गुरुदेवांच्या चरणी पोचलो होतो. त्या वेळी मला आध्यात्मिक प्रगती हा शब्दही ज्ञात नव्हता. ‘मला या व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसार जायचे आहे’, एवढाच ध्यास माझ्या मनात होता. तो कालावधी माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाचा होता. आज या घटनेला २५ वर्षे होऊन गेली. तेवढेच पावसाळे आणि उन्हाळेही गेले. ‘मी कधी गुरुचरणांवर सेवेसाठी पोचलो’, हे मला समजलेही नाही. जीवनात पुष्कळ चढ-उतार आले. कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्या विरोधात आजही देवाने मला तग धरून ठेवले आहे.
२. साधनेतील चुकांमुळे आध्यात्मिक पातळी घसरू लागल्याने साधकाच्या मनात गुरूंची कृपा संपादन करू शकत नसल्याची सल असणे
आम्ही वयाने मोठे झालो. दुसरीकडे गुरुदेवांच्या वयोमानामुळे त्यांचे दर्शन केवळ सूक्ष्मरूपाने आठवणींना उजाळा देऊन घ्यायचे, एवढेच आमच्या जीवनात राहिले. ‘गुरुदेवांच्या इच्छेशिवाय किंवा त्यांच्या आशीर्वादाशिवाय कुणीच अध्यात्माची एक पायरीही चढू शकत नाही’, हे त्रिवार सत्य आहे. त्यानंतर माझी ४ वर्षांपूर्वी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली होती. सलग ४ वर्षे पातळी वाढत गेली आणि त्यानंतर माझ्या चुकांमुळे पातळी २-२ टक्के न्यून होऊ लागली. या कालावधीत मनाची निराशा साहजिकच होती; कारण ‘एक-एक वर्ष व्यय होत होते; परंतु गुरूंची कृपा संपादन करता येत नव्हती’, हीच माझ्या मनाला सल (बोच) होती.
३. ‘आध्यात्मिक प्रगती झाली नाही, तरी निरपेक्षपणे गुरुसेवेचा ध्यास मनात निरंतर असावा’, अशी साधकाने गुरुचरणी प्रार्थना करणे
त्यानंतर मनाचा एकच निश्चय झाला, ‘मला माझी प्रगती नको, तर मला गुरुचरण हवे आहेत.’ माझ्या मनाची तगमग एवढीच आहे, ‘मी या मायेत कितीही गुरफटून गेलो, तरी गुरुसेवेचा कधीच विसर पडू नये. प.पू. डॉक्टर मला एवढेच म्हणायचे आहे की, मला माझी आध्यात्मिक प्रगती नको. मला प्रगतीची चिंता आणि त्यासाठी वरवर दिखाव्यापुरती सेवा करायची नाही. जीवनभर कितीही चढ-उतार आले, मी कितीही मायेत गुरफटलो, तरी मला केवळ अन् केवळ तुमच्या चरणांची सेवा मनापासून करण्याची संधी मिळावी. मला मोक्षही नको, तर निरपेक्ष सेवा करण्याची आणि सदैव तुम्ही करत असलेल्या मानव कल्याणाच्या कार्यात खारीचा सेवारूपी वाटा उचलून तुमच्या चरणी लीन रहाण्याचा आशीर्वाद मला मिळावा’, हीच एकमेव प्रार्थना आहे.’
– श्री. अविनाश जाधव (२०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, गोवा. (३.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |