जिवाची बाजी लावून घोडखिंडीला पावनखिंड करणारे शूरवीर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे !

आज बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे, तसेच शिवा काशीद यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…

बाजीप्रभु देशपांडे

बाजीप्रभु देशपांडे हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातील पिढीजात देशकुलकर्णी (गावाचे लेखापाल) होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध करणार्‍या बांदलांचे बाजी हे दिवाणजी होते; परंतु बाजीप्रभु स्वराज्य स्थापनेच्या कामी महाराजांकडे आले. बाजींनीही स्वराज्यासाठी स्वनिष्ठा छत्रपती शिवरायांना समर्पिली.

सिद्धी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी महाराजांना घेऊन बाजी विशाळगडाकडे निघाले होते. त्या वेळी ‘आपली फसवणूक झाली’, हे लक्षात येऊन विजापूरचे सैन्य त्यांचा पाठलाग करत होते, हे लक्षात आले. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडिलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी आणि फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. सहस्रोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ घंटे चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतांनाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या धाडसाने ६ ते ७ घंटे खिंड लढवली. सिद्धीचे सैन्य अडवतांना कामी आलेले मराठी मावळे, धारातिर्थी पडलेले बंधू फुलाजी, घायाळ झालेले स्वत:चे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते.

‘महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले’, याचा इशारा देणार्‍या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकू येईपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. घोडखिंडीतील हा लढा मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमाची शर्थ मानला जातो.

– श्री. माधव विद्वांस (साभार : फेसबुक)

छत्रपती शिवराजे आणि स्वराज्य यांच्यासाठी शिवा काशीद यांचे समर्पण !

छत्रपती शिवराजांनी पन्हाळा सोडण्याचे ठरवले आणि समवेत ६०० हत्यारबंद पायदळ, बाजीप्रभूंसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळ्यावरून निसटले. १२ जुलै १६६०, आषाढ पौर्णिमा, रात्रीचे सुमारे १० वाजण्याची वेळ, विजा चमकत होत्या, पाऊस कोसळत होता आणि एवढ्यात सिद्दीच्या एका पहारेकर्‍याने हे पाहिले आणि तो ओरडला, ‘दगा दगा !’ ही चाहूल लागताच राजांनी दोन पालख्या केल्या. एका पालखीत ते स्वत: तर दुसर्‍या पालखीत शिवरायांसारखा दिसणारा, त्यांच्यासारखाच पेहराव केलेला प्रति शिवाजी (शिवा काशीद) बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले. हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्दी जौहरकडे पोचवली. जौहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले; पण ‘ते खरे शिवाजी नाहीत’, हे कळताच शिवाजी म्हणून पकडून आणलेल्या शिवा काशीदचा शिरच्छेद करण्यात आला. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी, छत्रपती शिवराजांसाठी शिवा काशीदने समर्पण केले. – श्री. माधव विद्वांस