नामस्मरणाचे महत्त्व सांगणारी सुवचने
१. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की, परमेश्वर सुटला.
२. अडचणी असल्या तरी नाम घेता येते; म्हणून नामस्मरण न करण्याविषयी सबबी सांगू नका. सबब सांगितली की, त्यापासून लबाडी उत्पन्न होते. लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो.
३. अशी भावना ठेवून वागावे की, मी देवाचा आहे, तो माझा पाठीराखा आहे आणि म्हणून काही झाले, तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)