बांगलादेशी नागरिकांच्या सुटकेसाठी बनावट जामीन दिल्याच्या प्रकरणी पुणे येथे अधिवक्त्यासह अन्य एकावर गुन्हा नोंद !
पिंपरी (पुणे) – अवैधरित्या भारतात रहाणार्या ५ बांगलादेशी नागरिकांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या सुटकेसाठी पिंपरी न्यायालयात बनावट जामीन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राहुल बनसोडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपींना जामीन देण्यासाठी उपस्थित असलेले अधिवक्ता आणि आरोपींच्या जामिनासाठी अधिवक्त्यांच्या संपर्कात असलेले आरोपींचे नातेवाईक किंवा मित्र यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी न्यायालय येथे घडला.
बांगलादेशी नागरिकांच्या सुटकेसाठी स्थानिक रहिवासी असणारा जामीनदार द्यायचा होता; मात्र जामीन देण्यासाठी उपस्थित असलेल्या अधिवक्त्यासह इतर आरोपींनी बनसोडे हे स्वतः न्यायालयात उपस्थित नसतांनाही त्यांच्या आधारकार्डाचा वापर करत आरोपींना जामीन देऊन न्यायालय आणि तक्रारदार यांची दिशाभूल करून फसवणूक केली. पिंपरी पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका :बनावट जामीन देणार्या अधिवक्त्यालाही बांगलादेशी नागरिकांसमवेत भारतातून हाकलायला हवे ! |