एका मतदान केंद्रासाठी १ सहस्र ५०० मतदार ठेवणार !

मुंबई – लोकसभा निवडणुकीत एका मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढल्याने झालेली गडबड लक्षात घेता मतदान केंद्रांची संख्या वाढवावी, या राजकीय पक्षांच्या सूचनेनुसार एका मतदान केंद्रात १ सहस्र ५०० पर्यंतच मतदार असावेत, अशी सूचना निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक अधिकार्‍यांना केली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसूचींचे विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकार्‍यांसमवेत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यानुसार केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या संदर्भात विविध सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

यामध्ये नवीन मतदान केंद्र एकाच इमारतीत ठेवणे, भौगोलिक सलगता राखणे, कुटुंब विभागले जाणार नाही, याची दक्षता घेणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.