संपादकीय : राष्ट्रोत्थानाचे दायित्व पुन्हा पेलावे लागेल !

अन्य देशांनी कितीही आर्थिक, वैज्ञानिक, भौतिक प्रगती केली, तरी आत्मशांतीसाठी जगामध्ये भारताविना पर्याय नाही. विश्वात भारत हेच आत्मशांतीचे एकमेव स्थान आहे. याचे कारण भारतातील ‘आध्यात्मिक गाभा’ होय ! त्यामुळेच भारताला विश्वाचा ‘आध्यात्मिक गुरु’, असे संबोधले जाते आणि याचे मूळ गुरु-शिष्य परंपरेत आहे. सद्यःस्थितीत भारतासह सर्वच देश हिंसाचार, बलात्कार, भ्रष्टाचार, पर्यावरणहानी, प्रदूषण आदी विविध समस्यांनी गांजले आहेत. यातून बाहेर पडण्याचा शाश्वत मार्ग गुरु-शिष्य परंपरेकडेच येतो. याचे कारण भारतीय शिक्षणाचा उद्देश ‘अर्थाजन’ हा कधीही नव्हता. भारतीय शिक्षण ज्ञानार्जनावर आधारित होते. ‘दाविते ज्ञानभानुते । अज्ञान तम नाशिते । सुखशाश्वत जी देते । ती विद्या मिळवू इथे ।।’, असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. म्हणजे ‘सूर्याप्रमाणे तेज प्रदान करणे, अज्ञानाचा नाश करते, शाश्वत सुख प्रदान करते ती विद्या मिळवू येथे’, असा याचा अर्थ आहे. पाश्चात्त्य भौतिकदृष्ट्या कितीही प्रगत झाले, तरी त्यातून मिळणारे धन हे स्वत:च्या भौतिक सुखासाठीच खर्च करण्यापुरते ते सीमित आहेत; मात्र भारतीय ज्ञान भौतिक सुखाच्या पलीकडे आत्मज्ञानाकडे नेते. जीवनातील खाचखळगे हे प्रारब्धाने ओढवतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी क्रियमाण वापरावे लागते आणि हे आत्मज्ञान साधनेद्वारे प्राप्त होते, ही शिकवण केवळ भारतीय संस्कृतीच देते. पाश्चात्त्यांची शिक्षणपद्धत परीक्षेत मिळणार्‍या गुणांच्या टक्केवारीला महत्त्व देते, तर भारतीय संस्कृती संस्कारांना महत्त्व देते. शंभर टक्के गुण मिळवणारा विद्यार्थी व्यसनी असेल, वडीलधार्‍यांचा आदर करत नसेल, तर परीक्षेत मिळवलेल्या गुणांचा काय उपयोग ? भारतामध्ये हे ज्ञान प्राचीन काळापासून गुरूंकडून शिष्यांना मिळत होते. भारतातील पुरुषांमधील तेज, सामर्थ्य, क्षात्रवृत्ती, तर स्त्रियांमधील शालीनता, शील, पातिव्रत्य आणि राष्ट्राचे शौर्य, वैभव, समृद्धी अन् विविधतेतील एकता, याचा पाया या ज्ञानावरच उभा होता. गुरूंकडून शिष्याकडे, म्हणजे पुढच्या पिढीकडे संक्रमित होणारी ही ज्ञानाची परंपरा भारतावर आक्रमण करणारे तुर्की, मुसलमान, पोर्तुगीज, इंग्रज यांनी खंडित केली. यामुळे केवळ भारताचीच नव्हे, तर जगाची नैतिक हानी झाली. त्यामुळे भारताला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि जगाचा र्‍हास रोखण्यासाठी गुरु-शिष्य परंपरेचे पुनरुज्जीवन अपरिहार्य आहे.

स्वत:चा धर्म वाढवण्यासाठी आलेले भारतीय संस्कृती कसे अंगीकारणार ?

मोगल असो वा इंग्रज, त्यांचा साम्राज्य विस्तार हा धार्मिक प्रस्थ निर्माण करण्यासाठी होता. याला इतिहास साक्षी आहे. या लुटेर्‍यांनी भारतातील ज्ञान घेतले असते, तर युरोप आणि इस्लामी राष्ट्रेही समृद्ध झाली असती; परंतु त्यांचा उद्देश धर्मांधच होता. अशा धर्मांधांचा धर्म समृद्ध भारताने का पोसावा किंवा जोपासावा ? परंतु स्वतंत्र भारतात ‘सर्वधर्मसमभाव’ या गोंडस नावाखाली आक्रमणकर्त्यांच्या धर्माचे पुनर्वसन झाले आहे. सद्यःकाळात पुनर्वसन झालेलेच मूळ निवासी असलेल्या हिंदूंच्या डोक्यावर बसले आहेत. ख्रिस्ती असोत वा मुसलमान भारतावर आक्रमण करतांनाही ज्यांनी भारतीय ज्ञानाचा अंगीकार केला नाही, ते आजतरी भारतीय ज्ञानाचा अंगीकार का करतील ? हा प्रश्नच आहे. ‘आपण भारतीय संस्कृतीचा अंगीकार करण्यासाठी आलेलो नाही, तर धर्मप्रसारासाठी आलो आहोत’, अशी स्पष्टता ख्रिस्ती मिशनर्‍यांमध्येही आहे आणि इस्लामी धर्मांधांमध्येही आहे. सर्वधर्मसमभावाच्या कचाट्यात सापडलेले हिंदू मात्र ही मंडळी लोकशाही मानतात या भ्रामक कल्पनेत आहेत. काँग्रेसने राज्यघटना हवी त्याप्रमाणे वाकवून हिंदूंचे सांस्कृतिक हनन केले आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा पुढे आणण्याचे दायित्व गुरु आणि शिष्य यांवर आहे.

राष्ट्र उत्थानाचे कार्य करणारी परंपरा !

अनेकदा गुरु-शिष्य परंपरेकडे केवळ आध्यात्मिक अंगाने पाहिले जाते; परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. गुरु-शिष्य परंपरेचा प्रभाव सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक आदी समाजातील सर्व घटकांवर होतो. समर्थ गुरु त्यांच्यासारखे शिष्य घडवतात आणि असे शिष्य समाजातील विविध क्षेत्रांत प्रभाव पाडतात. राजा होणारा शिष्य आदर्श राज्यकारभार करतो. व्यापारी शिष्य आदर्श व्यापार करतो. पौरोहित्य करणारा शिष्य यजमानाच्या हिताचा विचार करून विधी करतो. म्हणजेच गुरुकुलातून बाहेर पडणारे शिष्य आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यात योगदान देतात. यातच भारताची समृद्धी दडलेली आहे. गुरु-शिष्य परंपराच राष्ट्राचे उत्थान करणारी आणि राष्ट्राची जडणघडण करणारी आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. येथे हे सांगण्याचे कारण एवढेच की सद्यःस्थितीत राष्ट्राची जडणघडण करण्यासाठी गुरु-शिष्य परंपरेची आवश्यकता आहे. मधल्या काळात ही परंपरा ढासळली. त्यामुळेच इंग्रज आणि मोगल भारतात आल्यावर येथील शासकांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी एकत्रित लढा दिला नाही. आजही राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदू संघटित नाहीत. महाभारताचे युद्ध पांडवांना साम्राज्य मिळवून देण्यासाठी नव्हते, तर अधर्मी कौरवांचा नाश करण्यासाठी होते. यासाठीच एका गुरूंनी शिष्याला भगवद्गीतेचे ज्ञान दिले. हाच हिंदूंचा सर्वाेत्तम धर्मग्रंथ आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. नंदराजाच्या अत्याचारी राजवटीचा बीमोड करण्यासाठी वेदाध्ययन करणार्‍या चाणक्यांनी चंद्रगुप्ताला घडवले. महाराष्ट्रात मोगलांनी आई-बहिणींच्या अब्रूवर हात टाकला, तेव्हा त्याला प्रतिकार करण्यासाठी तलवार उपसणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना बळ देण्यासाठी समर्थ रामदासस्वामी यांनी बलोपासक युवक घडवले. आजही राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अशा गुरु-शिष्यांची आवश्यकता आहे.

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे बहुतांश हिंदू राजकीय पक्षांमध्ये आणि संप्रदायामध्ये अडकले आहेत. अशा वेळी भारतामधील आध्यात्मिक परंपरेमध्येच हिंदूंना धर्मकार्यासाठी जागरूक करण्याची शक्ती आहे. हिंदु धर्मामध्ये ईश्वरप्राप्तीसाठी विविध आध्यात्मिक मार्गाने साधना करणारे शेकडो संप्रदाय आहेत. ईश्वरप्राप्तीच्या हेतूने या सर्व संप्रदायांची उपासना चालू असते; पण धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकले, तर आपली संस्कृती टिकेल, हे सर्वच संप्रदायांनी समजून घेऊन सद्यःस्थितीत धर्मरक्षणाच्या कार्यासाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रोत्थानाचे कार्य पुन्हा एकदा गुरु-शिष्य परंपरेला पेलावे लागणार आहे.