ईश्वरस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाशी संबंधित वैशिष्ट्ये आणि त्यांची लीला !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना ‘माझ्या कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे मला ‘अवतार’ म्हणतात ?’, असा प्रश्न विचारला होता. याविषयी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान हे गुरुदेवांची महती ठळक करणारे आहे; मात्र त्याच वेळी असेही जाणवले की, गुरुदेवांनी लिहिलेल्या ‘परमेश्वर आणि ईश्वर’ या सनातनच्या ग्रंथात ‘गुरु आणि ईश्वर एकच असतात. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरु आणि गुरूंचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर !’,असे लिहिले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अद्वितीय कार्यामुळे त्यांना ‘मोक्षगुरु’, ‘ज्ञानगुरु’, ‘राष्ट्रगुरु’, ‘जगद्गुरु’ आदी विशेषणेही लागू आहेत. म्हणजे जे स्वतः ईश्वरस्वरूप आहेत, त्यांना अवतारत्वाची सर्व वैशिष्ट्ये लागू होणारच ! थोडा अभ्यास केल्यावर गुरुदेवांची पुढील काही वैशिष्ट्ये लक्षात आली, तसेच ते करत असलेल्या गुरुलीलेचा पुसटसा कयास बांधता आला. ती सूत्रे श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. परमेश्वर, ईश्वर, अवतार आणि देव या संज्ञांचा अर्थ !
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परमेश्वर आणि ईश्वर’)
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या ईश्वरत्वाविषयीचे विश्लेषण !
‘वर दिलेल्या सारणीतील ईश्वराची लक्षणे आणि गुरुदेवांची वैशिष्ट्ये यांचा संबंध पुढीलप्रमाणे आहे’, असे लक्षात आले.
२ अ. निर्गुण तत्त्व : वर्ष २००७ पासून गुरुदेव रामनाथी, गोवा येथे असलेल्या सनातनच्या आश्रमातून बाहेर गेलेले नाहीत. देश-विदेशांतील अनेक साधकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही; मात्र तरीही अशा सहस्रो साधकांना गुरुदेवांविषयी विविध अनुभूती येतात. गुरुदेवांच्या निर्गुणत्वाची अनुभूती त्यांना घरबसल्या येते.
२ आ. प्रकट आणि कार्यरत शक्ती : गुरुदेव आश्रमातून बाहेर न जाताही सनातनचे कार्य आपोआपच वाढत आहे. त्यांच्या केवळ संकल्पामुळे त्यांची शक्ती कार्यरत झाल्याच्या अनुभूती (उदा. धर्मकार्यातील अडथळे दूर होणे, धर्मप्रसाराची संधी आपोआप मिळणे) शेकडो साधक घेत आहेत.
२ इ. आनंदाची अनुभूती : गुरुदेवांच्या दर्शनाने आनंद आणि शांती यांची अनुभूती येते. त्यांना पहाणारा स्वतःला विसरून जातो. त्यासोबतच त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येताच अनेक जिज्ञासू, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती आदींना आनंद आणि शांती यांची अनुभूतीही येते. सर्वसामान्य व्यक्तीलाही आश्रमाचे हेच वैशिष्ट्य भावते. त्यामुळे पुन्हा एकदा गुरुदेवांचे ईश्वरत्व सिद्ध होते.
३. ‘गुरुदेवच ईश्वर आहेत’, याची स्थुलातील काही कारणे
अ. वर्ष १९९६ मध्ये गुरुदेवांनीच ‘ईश्वरी राज्य स्थापने’चा संकल्प सर्वप्रथम केला. तेव्हा त्यांनी त्रेतायुगानुसार ‘रामराज्य’ वा द्वापरयुगानुसार ‘धर्मराज्य’ असा उल्लेख केलेला नव्हता.
आ. वर्ष १९९९ पासून सनातनच्या ग्रंथांतून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पुढील ओळी प्रसिद्ध केल्या जात आहेत.
‘स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा ।
कैसे असू सर्वदा सर्वा ठायी ।।
सनातन धर्म माझे नित्य रूप ।
त्या रूपे सर्वत्र आहे सदा ।।’
यात ‘सनातन धर्म माझे नित्य रूप ।’ असे त्यांनी सांगितले आहे. ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ आहे ‘ईश्वर’; म्हणून प.पू. गुरुदेव ईश्वरच आहेत.
इ. वर्ष २००४ मध्ये एका साधकाने गुरुदेवांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी तर अनादि-अनंत आहे. मला जन्म आणि मृत्यू नाही. माझा वाढदिवस कसा साजरा करणार ?’’
ई. गुरुदेवांनी सांगितलेली ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करून मे २०२४ पर्यंत १२७ साधक संत बनले; म्हणजे ‘गुरु’पदी विराजमान झाले आहेत. आजवर कोणत्याही अवताराने एवढ्या मोठ्या प्रमाणात गुरुपदाचे अधिकारी असलेल्या शिष्यांची निर्मिती वा उद्धार केलेला नाही.
४. स्वतः ईश्वरस्वरूप असूनही गुरुदेवांनी स्वतःच्या अवतारत्वाची सूत्रे विचारण्यामागील संभाव्य कारणे
अ. समाजाला ईश्वराच्या निर्गुण आणि निराकार रूपापेक्षा ईश्वराचे अवतारी अन् साकार रूप अधिक भावते. ईश्वराच्या तुलनेत अवतारी रूपाची महती लक्षात येणे सोपे असते.
आ. अवतारी रूपाच्या कार्याचा स्थुलातून परिणाम दिसून येतो. त्याचा कार्यकारणभाव कळणेही सोपे असते. त्यामुळे सर्वसामान्यांची श्रद्धा लवकर बसते.
इ. ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ या सिद्धांताला अनुसरून जे भक्तीमार्गी साधक किंवा नवीन जिज्ञासू आहेत, त्यांची श्रद्धा या विषयाच्या मथळ्यामुळे वाढण्यास साहाय्य व्हावे.
संत ज्ञानदेवांनी वर्णिले आहे, ‘जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।।’ – ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९६ म्हणजे ‘जो जो प्राणी जी जी इच्छा व्यक्त करील, त्याची ती ती इच्छा परिपूर्ण होवो.’ प.पू. गुरुदेवांनी सनातनमध्ये असे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे ज्याला ज्या पद्धतीने साधना करायची आहे, त्याला तशा प्रकारची त्या पद्धतीने साधना करू देण्यास तत्पर असलेल्या गुरुदेवांनी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना ‘माझ्या कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे मला अवतार म्हणतात ?’, असा प्रश्न विचारला.
गुरुदेव, आपल्या लीला समजणे, हे आम्हा पामरांच्या कल्पनाविश्वाच्या पलीकडचे आहे. असे असतांनाही मनात आलेले हे अज्ञ विचार आपल्या चरणी अर्पण करत आहे, यासाठी क्षमस्व !
‘आम्हा सर्वांवर आपली कृपादृष्टी अखंड राहू दे’, ही आपल्या चरणी प्रार्थना !
– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०२४)