‘ईश्वराचे अवतार असलेले ३ मोक्षगुरु लाभणे’, हे सनातनच्या साधकांचे अहोभाग्यच !

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

पू. डॉ. ॐ उलगनाथन्

‘सनातन संस्थेचे ३ मोक्षगुरु, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, हे सगुण रूपातील ईश्वराचे अवतारच आहेत. सूर्याकडून जे किरण पृथ्वीकडे येत असतात, त्यांतील ‘अतिनील किरण (Ultraviolet Rays)’ मनुष्याला सर्वांत अधिक हानी पोचवतात. ईश्वरनिर्मित पृथ्वीवर असलेल्या प्राणवायूच्या थरामुळे हे किरण पृथ्वीपर्यंत तेवढ्या तीव्रतेने पोचत नाहीत. त्यामुळे मनुष्य आणि प्राणीमात्र यांचे रक्षण होते. त्याचप्रमाणे वाईट शक्ती साधकांना त्रास देण्यासाठी येतात; पण त्या साधकांपर्यंत पोचू शकत नाहीत. सनातन संस्थेचे हे ३ मोक्षगुरु वाईट शक्तींमुळे साधकांना होणारा त्रास आधी स्वतःवर घेतात आणि तो पचवतात. हे ३ गुरु वाईट शक्तींची आक्रमणे परतवून लावतात. सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांना वाईट शक्ती काही अंशीच त्रास देतात.

‘धर्मसंस्थापना करणे’, म्हणजे सूक्ष्मातील वाईट शक्तींचे प्रचंड आक्रमण पचवणे होय ! कलियुगातील अवतारांचे हे खरे कार्य समाज आणि साधक यांपासून गुप्त रहाते; कारण वाईट शक्ती डोळ्यांना दिसत नाहीत. सनातनच्या साधकांचे अहोभाग्य आहे की, गुरुदेवांसारखे अवतारी पुरुष त्यांना ‘गुरु’ म्हणून लाभले आहेत. धर्मसंस्थापनेसाठी वैकुंठातून पृथ्वीवर आलेल्या सनातनच्या ३ मोक्षगुरूंचे गुणवर्णन पंचमहाभूते आणि निसर्ग, हेसुद्धा करतात.

वर्ष २०२४ मध्ये हा संदेश महर्षि साधकांपर्यंत पोचवत आहेत. श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पृथ्वीवरील गोमंतक भागात (गोवा येथे) भूवैकुंठरूपी सनातन आश्रमात विराजमान आहेत. त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी ‘श्रीसत्‌शक्ति’ या भूवैकुंठात राहून तो (रामनाथी) आश्रम आणि तेथे रहाणारे साधक यांचे परिपालन करत आहेत, तर दुसर्‍या आध्यात्मिक उत्तराधिकारी ‘श्रीचित्‌शक्ति’ या दक्षिण भारतातील ‘भूकैलास’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कांची क्षेत्रात विराजमान आहेत. ग्रहगतीच्या पलीकडे जाऊन साधकांसाठी अहोरात्र झटणार्‍या, वाईट शक्तींशी झुंज देऊन साधकांचे रक्षण करणार्‍या, साधकांचे प्रारब्धभोग जाळणार्‍या आणि त्यांची विहंगम मार्गाने आध्यात्मिक उन्नती करून घेणार्‍या सनातन संस्थेच्या तिन्ही मोक्षगुरूंना आम्हा सप्तर्षींचे गुरुपौर्णिमेनिमित्त त्रिवार वंदन !’

– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून (१३.७.२०२४, सकाळी १०.३०))

 

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.