Pakistan 2023 census : पाकिस्तानात हिंदूंच्या लोकसंख्येत ३ लाखांची वाढ; मात्र एकूण टक्केवारीत घट !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या जनगणनेचे आकडे समोर आले असून त्यानुसार देशातील हिंदूंची लोकसंख्या ३८ लाख झाली आहे. हिंदू आता पाकिस्तानमधील सर्वांत मोठा अल्पसंख्यांक समुदाय बनला आहे. हा आकडा वर्ष २०१७ च्या तुलनेत अधिक आहे. वर्ष २०१७ मध्ये हिंदूंची संख्या ३५ लाख होती. हिंदूंची लोकसंख्या ३ लाखांनी वाढली असली, तरी एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचा वाटा १.७३ वरून १.६१ टक्क्यांवर आला आहे.
१. वर्ष २०२३ च्या जनगणनेमध्ये पाकिस्तानची एकूण लोकसंख्या २४ कोटी ४ लाख ५८ सहस्र ८९ होती. एकूण लोकसंख्येतील मुसलमानांची संख्या वर्ष २०१७ मध्ये ९६.४७ टक्के होती, ती वर्ष २०२३ मध्ये ९६.३५ टक्के झाली आहे. वर्ष २०५० पर्यंत पाकिस्तानची लोकसंख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.
२. अहमदी मुसलमानांची लोकसंख्या घटली आहे. वर्ष २०१७ मध्ये १ लाख ९१ सहस्र ७३७ (एकूण लोकसंख्येच्या ०.०९ टक्के) वरून १ लाख ६२ सहस्र ६८४ (एकूण लोकसंख्येच्या ०.०७ टक्के) इतकी झाली आहे.
ख्रिस्त्यांचीही लोकसंख्याही वाढली !
इतर अल्पसंख्यांक समुदायांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. ख्रिस्त्यांची लोकसंख्याही २६ लाखांवरून ३३ लाखांवर पोचली. एकूण लोकसंख्येमध्ये ख्रिस्त्यांचा वाटा १.२७ वरून १.३७ टक्के झाला आहे.