आता मांसविक्री करणार्या दुकानांवर मांस ‘हलाल आहे कि झटका ?’, हे लिहावे लागणार ! – जयपूर महानगरपालिका
जयपूर महानगरपालिकेचा निर्णय
जयपूर (राजस्थान) – येथे मांसविक्री करणार्या दुकानांतील मांस हे ‘हलाल आहे कि झटका ?’, ते दुकानांवर लिहावे लागणार आहे. जयपूर महानगरपालिकेने मांसविक्री करणार्या सर्व दुकानदारांना याविषयीचा आदेश दिला असून लवकरच त्याची कार्यवाही (अंमलबजावणी) करण्यात येईल, अशी माहिती जयपूरच्या महापौर डॉ. सौम्या गुर्जर यांनी दिली. शहरात मांसविक्रीचे दुकान चालू करायचे असल्यास महानगरपालिकेकडून परवाना घ्यावा लागणार असून अशा दुकानदारांना व्यावसायिक भूमीवरच मांसाची दुकाने चालू करण्याची अनुमती दिली जाणार आहे.
महापौर डॉ. गुर्जर पुढे म्हणाल्या, ‘‘जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जयपूरमध्ये १५० प्रभाग आहेत. त्यांतील लोकांनी माझ्याकडे अनेकदा याविषयी तक्रारी केल्या आहेत. मांसाच्या दुकानांजवळ कचरा टाकला जात असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याच्याही तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. या संदर्भात नुकतीच आमच्या कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात ‘मांसविक्रीची दुकाने निवासी भागांबाहेर असावीत’, असे ठरले. मी स्वत: शाकाहारी आहे, दुर्गंधी सहन करू शकत नाही. माझ्यासारखी समस्या इतरही अनेक नागरिकांचीही असू शकते.’’
हलाल आणि झटका मांस यांतील भेदहलाल मांस म्हणजे प्राण्यांचे तोंड मक्केच्या दिशेला करून त्यांच्या गळ्याची नस चिरली जाते आणि त्यांना तडफडत मरू दिले जाते. त्यात प्राण्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात वहाते. याउलट हिंदु किंवा शीख धर्मांमध्ये ‘झटका’ पद्धतीने प्राण्यांची हत्या केली जाते. त्यात प्राण्यांची मान एकाच घावात कापली जात असल्याने त्यांना अल्प प्रमाणात त्रास होतो. |