राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना ‘राज्यस्तरीय’ पक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवावी लागणार !
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा दर्जा आणि निवडणूक चिन्ह यांविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून राज्यस्तरीय पक्ष म्हणून दर्जा दिला आहे, तर शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँगेस-शरदचंद्र पवार’ पक्षाचा राज्यस्तरीय पक्षामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक या दोन्ही पक्षांना राज्यस्तरीय पक्ष म्हणून लढवावी लागेल.
वर्ष २०१९ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक लढवली होती; मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ‘राज्यस्तरीय पक्ष’ म्हणून निवडणूक लढवावी लागली. यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘घड्याळ’, तर ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार’ पक्षाचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह कायम ठेवले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा समावेशही राज्यस्तरीय पक्षामध्ये केला आहे, तसेच या पक्षाचे ‘मशाल’ हे चिन्हही कायम ठेवले आहे. आम आदमी पक्षाचा समावेश ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून केला आहे, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय स्तराचा दर्जा काढून ‘अन्य राज्यांतील राज्यस्तरीय पक्ष’ असा दर्जा निवडणूक आयोगाने दिला आहे.