अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, ही हिंदवी स्वराज्य स्थापनेतील सर्वांत मोठी घटना ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वाघनखांसह इतर शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद़्घाटन !
सातारा – अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आला आहे. हा सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. शिवरायांची वाघनखे हे शौर्याचे प्रतीक आहे आणि त्याचे दर्शन शिवप्रेमींना घेता येणार आहे. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. हिंदवी स्वराज्य स्थापनेतील ही सर्वांत मोठी घटना होती. आज या पराक्रमाचा एक एक घटनाक्रम डोळ्यासमोर उभा रहात आहे, असे वक्तव्य वाघनखांसह इतर शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तूसंग्रहालया’तून छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात पोचली आहेत. ही वाघनखे १९ जुलैपासून सातार्यात प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात आली आहेत. या वाघनखांसह इतर शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद़्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
१. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत राज्याच्या पावसाळी अधिवेशनात घोषणा केली होती. या वेळी सोहळ्याला येताच मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शिवरायांना अभिवादन केले, तसेच तिथे उपस्थित महिलांनी या तिघांना राखी बांधली.
२. सोहळ्यात बोलतांना सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, वाघनखांचे पुनरागमन ही महाराष्ट्रासाठी मोठी प्रेरणा आहे. लंडनहून ही वाघनखे येणे, ही अभिमानाची गोष्ट आहे. ब्रिटनच्या प्रतिनिधींकडून काही नियम लेखी देण्यात आले होते. ते नियम सरकारने मान्य केले आहेत. त्यामुळे हे नियम मोडले, तर ही वाघनखे ते माघारी घेऊन जाऊ शकतात.
वाघनखाच्या संरक्षणासाठी चोख बंदोबस्त
ही शिवकालीन वाघनखे वस्तूसंग्रहालयातील दालन क्रमांक ३ मध्ये ठेवण्यात आली आहेत. वाघनखांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर, तसेच संरक्षण यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला आहे. प्रतिदिन सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी २ शाळेच्या विद्यार्थ्यांना वाघनखे पहाण्यास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लोकांसाठी प्रत्येकी १० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे. प्रतिदिन सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वाघनखे पहाण्यास उपलब्ध असणार आहे. पुढील ७ महिने ही वाघनखे सातार्यामधील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत. या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांचेही प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.
ढोल-ताशे, वाद्यांच्या गजरात फेरी !१९ जुलैला सकाळी मोठ्या उत्साहात शासकीय निवासस्थान ते छत्रपती शिवाजी संग्रहालय अशी फेरी काढण्यात आली. ढोल-ताशे, वाद्यांच्या गजरात आणि मर्दानी खेळांच्या उत्साहात ही फेरी काढण्यात आली. त्यानंतर ज्या ठिकाणी वाघनखे ठेवण्यात आली आहेत, त्या शिवाजी संग्रहालयात ती वाघनखे सर्वांना पहाण्यासाठी खुली करण्यात आली. |
सातारकरांचे अभिवादन स्वीकारत महायुतीचा रोड शो !
यावेळी ‘ओपन जीप’मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार संग्रहालयाकडे पोचले. महायुतीचे मोठे शक्तीप्रदर्शन पहायला मिळाले. तसेच शिवप्रेमींकडून घोषणाही देण्यात आल्या. ओपन जीपमधून जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सातारकरांचे अभिवादन स्वीकारत महायुतीचा ‘रोड शो’ पार पडला.
शासकीय कार्यक्रमातील ध्वनीचित्रफितीमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि सियाचिन भारतापासून दाखवला वेगळा !
वाघनखे भारतात आल्यानंतर सातारा येथे वाघनखे आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या निमित्ताने शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि विशेष टपाल तिकिटाचा अनावरण सोहळाही पार पडला. या कार्यक्रमाची ध्वनीचित्रफीत प्रसिद्ध करतांना सांस्कृतिक कार्यमंत्रालयाकडून गंभीर चूक झाली. सरकारने शासकीय कार्यक्रमातील ध्वनीचित्रफितीमध्ये पाकव्याप्त काश्मीर हा भारतापासून वेगळा दाखवून तो भाग पाकिस्तानात असल्याचे दाखवले आहे, तसेच सियाचिन हा प्रदेशही रेखांकित (डॉटेड लाईन) दाखवून तोही वेगळा दाखवला आहे. (या गंभीर चुकीवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)