‘इस्रो’ने नासाच्या उपग्रहाच्या साहाय्याने सिद्ध केला रामसेतूचा पहिला नकाशा !
बेंगळुरू (कर्नाटक) – इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नासाच्या ‘आय.सी.ई. सॅट २’ नावाच्या उपग्रहाच्या साहाय्याने समुद्राच्या पाण्याखाली गेलेल्या रामसेतूचा नकाशा सिद्ध केला आहे. हा पहिला सर्वसमावेशक नकाशा असल्याचे सांगण्यात येत आहे. रामसेतू हा ‘अॅडम्स ब्रिज’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी रामसेतूसंदर्भात केलेले संशोधन ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ नावाच्या वैज्ञानिक नियतकालिकात (‘जर्नल’मध्ये) प्रकाशित झाले आहे. इस्रोच्या जोधपूर, तसेच भाग्यनगर येथील ‘नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर’च्या शास्त्रज्ञांनी हा निकाशा सिद्ध केला आहे.
या शास्त्रज्ञांनी सांगितले की, आम्ही नासाचा उपग्रह ‘आय.सी.ई. सॅट २’च्या ‘वॉटर पेनीट्रेट फोटॉन’ वापरून रामसेतूचा पहिला तपशीलवार नकाशा बनवला आहे. रामसेतूचा ९९.९८ टक्के भाग अतिशय उथळ पाण्यात बुडाला. त्यामुळे त्याचे नौकेद्वारे अथवा प्रत्यक्ष पाण्यात उतरून सर्वेक्षण करणे शक्य नाही. गिरीबाबू दंडबथुला यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व केले.
शास्त्रज्ञांनी वर्ष २०१८ ते २०२३ पर्यंतच्या माहितीचा वापर करत जलमग्न सेतूच्या संपूर्ण लांबीचा १० मीटर ‘रिझोल्यूशन’चा नकाशा सिद्ध केला. या नकाशानुसार २९ किलोमीटर लांबीच्या रामसेतूची समुद्रसपाटीपासून उंची ८ मीटर इतकी आहे. अशा प्रकारचा नकाशा आजपर्यंतचा सर्वांत मोठा नकाशा आहे.