‘डेटा ॲनालिटिक सेल’च्या अभ्यासातून सरकारी खात्यांमधील विसंगती उघड
गोवा विधानसभा अधिवेशन
पणजी, १८ जुलै (वार्ता.) – विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत एका अतारांकित प्रश्नाद्वारे ‘डेटा ॲनालिटिक सेल’च्या (माहिती विश्लेषण विभागाच्या) अभ्यासाचा अहवाल आणि या अहवालावरून सरकारने केलेली कृती यांविषयी माहिती मागितली होती. ‘डेटा ॲनालिटिक सेल’च्या अभ्यासातून अनेक सरकारी खात्यांमधील विसंगती उघडकीस आली आहे. ती पुढीलप्रमाणे…
१. ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजना’ या समाजकल्याण योजनेचे ४९९ लाभार्थी पर्यटन व्यवसाय करत आहेत, तर अन्य १२४ लाभार्थ्यांकडे व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रासाठी लागणारी वीजजोडणी आहे. यामुळे या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळाला ? याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२. ८९७ हॉटेलमालक व्यावसायिक वीजजोडणीऐवजी घरगुती वीजजोडणी वापरत आहेत. यामुळे वीज खात्याचा महसूल बुडण्याबरोबरच आदरातिथ्य उद्योगक्षेत्रात कशा प्रकारे नियमांचे उल्लंघन केले जाते, याविषयी माहिती उघड झाली आहे.
३. राज्यातील २० सहस्र ८६६ व्यावसायिक वीज ग्राहक घरगुती वीजजोडणीच्या दराने विजेच्या वापराचे शुल्क भरत होते. यामुळे वीज खात्याचा महसूल बुडण्याबरोबरच राज्यातील सर्व वीजजोडण्यांचे ‘ऑडिट’ होण्याची आवश्यकता स्पष्ट होते.
४. राज्यातील २ सहस्र १०० लाभार्थी आणि त्यांच्या पत्नी ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजना’ आणि ‘गृह आधार योजना’ यांचा लाभ घेत होते. हे योजनेच्या नियमाचे उल्लंघन आहे.
५. ‘दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना’ या आरोग्य विमा योजनेच्या अंतर्गत ८६४ लाभार्थ्यांना मृत घोषित करण्यात आले आहे; मात्र हेच लाभार्थी ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजना’ आणि ‘गृह आधार’ योजना यांच्यामध्ये जिवंत दाखवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजना’, ‘गृह आधार’ आणि ‘कला सन्मान’ या योजनांचे ६ सहस्र १४९ मृत लाभार्थी ‘दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजने’त जिवंत असल्याचे म्हटले आहे. यामुळे सर्व योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे महत्त्व लक्षात येते.
५. ‘कला सन्मान’ योजनेच्या १५ लाभार्थ्यांकडे मद्यविक्रीचे दुकान चालवण्यासाठी अबकारी खात्याची अनुज्ञप्ती (परवाना) आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या निवड प्रक्रियेचा फेरआढावा घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते.
७. ४ सरकारी कर्मचार्यांकडे अबकारी खात्याची अनुज्ञप्ती (परवाना) आहे.
८. १९ दुकाने मद्यविक्रीची दुकाने म्हणून नोंद असली, तरी त्यांच्या नोंदी अबकारी खात्याकडे नाहीत.
काही प्रमुख विसंगती
- दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या ४९९ लाभार्थ्यांचा पर्यटन व्यवसाय
- ८९७ हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती वीजजोडणीचा वापर
- २० सहस्त्र ८६६ व्यावसायिक घरगुती वीजजोडणीच्या दराने शुल्क भरतात.
- ‘कला सन्मान’ योजनेचे १५ लाभार्थी मद्यविक्रीचे दुकान चालवतात.
- ‘दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजने’चे ८६४ लाभार्थी मृत घोषित; पण अन्य योजनांमध्ये ते जिवंत