पंढरपूरपर्यंत येत शिधा पुरवण्याचे अनोखे व्रत घेणारे मिलिंद चवंडके ! – ह.भ.प. सतीश महाराज निमसे
नगर – आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या दिंड्यांना अनेकजण अन्नदान करतात; पण दिंड्यांमागे थेट पंढरपूरजवळ येऊन किराणा साहित्यासह उपवासासाठी फराळाचे विविध प्रकार अगदी दूधही पुरवून कुणीही वारकरी उपाशी न रहावा याची काळजी घेत वारकर्यांशी समरस होणारा मिलिंद चवंडके हा महाराष्ट्र राज्यातील मुलूखावेगळा एकमेव माणूस आहे, असे कौतुकोद्गार ह.भ.प. सतीश महाराज निमसे यांनी काढले. प्रतिवर्षीप्रमाणे मिलिंद चवंडके हे पंढरीच्या वाटेवरील दिंड्यांना शिधा देण्यास पोचले असता ते बोलत होते.
नगर शहरामधील सर्वश्री नंदलाल मणियार, एन्.डी. कुलकर्णी, ह.भ.प. निळकंठ देशमुख, प्रा. मधुसूदन मुळे, संजय झिंजे, अधिवक्ता राजेंद्र कावरे, प्रकाश चंगेडिया, प्रदीप आंग्रे, संजय गेनाप्पा, प्रविण सोनी, प्रमोद (पिटूशेठ) गांधी, संजय गांधी, वैद्य विलास जाधव, रणजित रासकर, रवींद्र जाजू, सौरभ बोरूडे, मधुसूदन नेहेरे, नितीन पोतनीस, गणेश कांबळे, अनिल सोले, सौ. अंजली राऊत, सौ. अस्मिता तोंडवळकर, प्रा. ज्योती कुलकर्णी, सौ. ज्योती दांडेकर, अंजली देशमुख, श्रीमती आयनोर या सर्वांनी दिंड्यांच्या महाअन्नदान सेवेसाठी आवश्यक ते साहित्य तातडीने उपलब्ध करून दिले. डॉ. अंकीत मौर्य आणि ओंकार चवंडके यांनी अत्यंत श्रद्धेने वाहन व्यवस्था केली. या सर्वांची साथ मिळाल्यामुळेच आपल्या सर्वांच्या ह्रदयस्थ पांडुरंगाच्या दर्शनाचा आनंद मिळाला, असे मिलिंद चवंडके यांनी दिंडी सोहळ्यांमध्ये बोलतांना सांगितले.
गुरूपौर्णिमेसाठी अक्कलकोटला चाललेल्या ‘अग्निहोत्र संदेश पदयात्रे’मधील डॉ. दिगंबर जाधव, सौ. लता जाधव आणि विष्णु कवाणे यांच्यासह पंढरीकडे चालणार्या दिंड्या थांबवून मिलिंद चवंडके यांनी साहित्यांची भेट दिली. त्यांच्या या सेवेचे विविध दिंड्यांमधील महाराज मंडळींसह वारकर्यांमधून विशेष कौतुक होत आहे.
ह.भ.प. निमसे महाराज पुढे म्हणाले, ‘‘दिंड्या आपल्या गावात, आपल्या घराच्या अंगणात आल्यावर अन्नदान करणारे भाविक अनेक आहेत; पण मार्गस्थ झालेल्या दिंड्यांकडील शिधा संपत आला असतांना अगदी गरजेच्या वेळी दिंड्यांच्या भेटी घेऊन आवश्यक तो शिधा देण्याची निरपेक्ष सेवा परमश्रद्धेने करणारे मिलिंद चवंडके हे एकमेव आहेत. त्यांच्या सेवेचे हे १९ वे वर्ष आहे. नाथ संप्रदायाचे कार्य करतांना परिचय झालेल्या भाविकांशी संपर्क साधून महाअन्नदानासाठीच्या साहित्याचे संकलन करून खास प्रवास करत थेट पंढरपूरपर्यंत आणून देणे, ही फार मोठी सेवा आहे. असे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात कुणी केल्याचे पहावयास मिळाले नाही.’’
ह.भ.प. रघुनाथ ठोंबरे म्हणाले, ‘‘पांडुरंगाच्या भेटीस पायी चाललेल्या वारकर्यांना कोणत्याही प्रकारच्या औषधांची आवश्यकता नसते, तर सकस अन्नाची असते. हे नेमकेपणाने ओळखून पायी चाललेल्या दिंड्या थांबवत त्यांना उत्तम प्रतीचा शिधा, दर्जेदार फराळाचे पदार्थ, दूध देण्याचा उपक्रम मिलिंद चवंडके हे स्वयंस्फूर्तीने ‘एकला चलो रे…’ या उक्तिप्रमाणे राबवत आहेत. एकट्या व्यक्तीकडून प्रतिवर्षी चाललेली ही सेवा मोठ्या संस्था वा संघटना यांच्या सेवांपेक्षा निश्चितच अधिक मोलाची आहे. पांडुरंग त्यांना भरभरून आयुष्य देवो आणि ही सेवा अशीच जोमात चालत राहो, असे ते म्हणताच उपस्थित सर्व दिंडीकर्यांनी उच्चस्वरात हरिनामाचा गजर केला. अवघे वातावरण विठूमय झाले.’’
ह.भ.प. मधुकर महाराज श्राद्धे, देविदास महाराज निमसे, ह.भ.प. मुकुंद महाराज कटारे, नानाभाऊ देसाई, बाळासाहेब आहेर, दिगंबर आहेर (शास्त्रीबुवा), सौ. मंगलबाई आहेर, सुधाकर आहेर, किसनराव देसाई, बाळासाहेब काळे, रामेश्वर सोमासे, साहेबराव निमसे, ठकाजी निमसे यांच्यासह वारकरी बंधू-भगिनींनी या निरपेक्ष सेवेची प्रशंसा केली.