सनातनचे १२८ वे संतपद प्राप्त करणार्या कै. पू. (श्रीमती) सौदामिनी माधवन् कैमल (वय ८२ वर्षे) यांची कोची (केरळ) येथील सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
आज १९.७.२०२४ या दिवशी कै. पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल यांच्या देहत्यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
केरळ येथील पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल यांनी ६.७.२०२४ या दिवशी देहत्याग केला. त्या ८२ वर्षांच्या होत्या. पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल यांच्या समवेत सेवा करणार्या कोची (केरळ) येथील सनातन संस्थेच्या साधिका सुश्री (कु.) प्रणिता सुखटणकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. प्रेमभाव
‘श्रीमती सौदामिनी कैमलकाकू शाळेतील प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या शाळेतील शिक्षिका, विद्यार्थी, साधक, नातलग अशा अनेक लोकांना दूरभाषद्वारे जोडून ठेवले होते. त्या सनातन संस्थेच्या कोची येथील सेवाकेंद्रात रहात असल्या, तरी त्या सनातन संस्थेच्या सर्व आश्रमांतील साधकांच्या संपर्कात होत्या. एखादा साधक कोचीहून अन्य आश्रमात सेवेसाठी जात असेल, तर त्या त्याच्या समवेत तेथील साधक आणि संत यांच्यासाठी आवर्जून खाऊ पाठवायच्या.
२. इतरांचा विचार करणे
कैमलकाकूंचे सर्व गोष्टींकडे लक्ष असायचे. आश्रमात कोणी आले किंवा बाहेर गेले, तसेच एखाद्या साधकाला ‘काय हवे आणि काय नको ?’, याकडे त्यांचे लक्ष असायचे.
३. दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे वाचन त्या नियमितपणे करायच्या आणि त्यांत सांगितलेली सूत्रे कृतीत आणायच्या.
४. आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे गांभीर्य
कैमलकाकू समष्टीसाठी नामजप करायच्या (साधकांच्या साधनेतील अडचणी दूर होण्यासाठी त्यांच्यासाठी प्रार्थना आणि नामजप करणे). ‘नामजप करायचा राहिला’, असे त्यांच्याकडून कधीच झाले नाही. त्या आध्यात्मिक स्तरावरील उपाय नियमितपणे करायच्या. एखाद्या साधकाला त्रास होत असेल, तर त्या साधकाची स्थिती बघून त्या त्याला ‘नामजप कोणता करायचा ?’, हे सांगायच्या. त्याचप्रमाणे त्याचा त्रास न्यून व्हावा; म्हणून कागदावर देवतेच्या नामाचे मंडल करून त्यात त्याच्यासाठी प्रार्थना लिहायच्या.
५. सेवेची तळमळ
शारीरिक स्थिती चांगली असेपर्यंत कैमलकाकू घरोघरी जाऊन गुरुपौर्णिमेसाठी अर्पण गोळा करण्याची सेवा करत असत. त्यानंतर त्या दूरभाषवरून समाजातील जिज्ञासूंशी संपर्क साधून त्यांना साधना किंवा गुरुपौर्णिमा यांचे महत्त्व सांगायच्या आणि त्यांच्याकडून अर्पण करून घ्यायच्या. त्या त्याचा आढावा नियमितपणे द्यायच्या. अजूनही पुष्कळ जण त्यांची विचारपूस करत असतात.
६. आज्ञापालन
कैमलकाकूंचा परात्पर गुरु डॉ. आठवले, ईश्वर आणि संत यांच्या प्रति पुष्कळ भाव होता. संतांनी काही सांगितल्यावर त्या त्याचे तंतोतंत आज्ञापालन करायच्या. पुष्कळ वर्षांपूर्वी एकदा मंगळुरू येथील सनातन संस्थेच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८७ वर्षे) यांनी साधकांना मीठ-पाण्याचे आध्यात्मिक उपाय (पाण्यात खडे-मीठ घालून १० मिनिटे त्यात पाय बुडवून बसून नामजप करणे) नियमितपणे करायला सांगितले होते. काकूंनी हे उपाय प्रकृती खालावेपर्यंत कधीही चुकवले नाहीत.
असे अनेक गुण कैमलकाकूंमध्ये होते. त्यांना सर्व जण प्रेमाने ‘अम्मा’ म्हणत. ‘अशा प्रेमळ कैमलकाकूंचे गुण माझ्यातही येऊ देत’, हीच गुरुचरणी प्रार्थना !’
– सुश्री प्रणिता सुखटणकर, कोची सेवाकेंद्र, कोची, केरळ. (१३.७.२०२४)
प्रेमभावामुळे इतरांचा विचार करणार्या आणि संतांचे आज्ञापालन करणार्या पू. (कै.) श्रीमती सौदामिनी कैमल !
१. इतरांचा विचार करणे
मागच्या वर्षापासून वयामुळे त्यांचे आरोग्य ठीक नसायचे. त्या रुग्णाईत असल्याने त्यांना स्वतः स्नान करायला जमायचे नाही. मी त्यांना स्नान घालायला गेल्यावर त्या आधी चौकशी करायच्या. ‘माझा अल्पाहार झाला आहे का ?’, याविषयी विचारून अल्पाहार झाला नसेल, तर मी तो करून येईपर्यंत त्या थांबायच्या. प्रत्येक प्रसंगात ‘स्वतःमुळे इतरांना त्रास होऊ नये’, असा त्यांचा विचार असायचा.
२. संतांचे आज्ञापालन करून परिस्थिती स्वीकारणे
आरंभी आजींना ‘वैयक्तिक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून रहाणे’, ही परिस्थिती स्वीकारता येत नव्हती. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आजींना सांगितले, ‘‘इतरांनी सांगितलेले ऐकणे आणि स्वीकारणे’, ही तुमची साधना आहे.’’ तेव्हापासून आजींनी तसे प्रयत्न केले.
३. चौकस बुद्धी
वार्धक्यामुळे आजींना अधिक हालचाल करणे जमत नव्हते. त्यामुळे त्या एकाच ठिकाणी बसून रहायच्या, तरीही ‘सेवाकेंद्रात कोण आले आहे’ किंवा ‘कोणत्या दिवशी काय आहे ?’, हे सगळे त्यांना ठाऊक असायचे.
४. प्रेमभाव
आजींमध्ये प्रेमभाव असल्यामुळे त्यांनी अनेक जणांना भ्रमणभाषद्वारे जोडून ठेवले होते. नातेवाईक, इतर जिल्ह्यांतील साधक, सनातनचे हितचिंतक, तसेच सेवाकेंद्रात बांधकाम दुरुस्तीसाठी आलेले कंत्राटदार अशा अनेक जणांना त्यांनी जोडले होते. त्या भ्रमणभाषद्वारे किंवा सेवाकेंद्रात आलेल्या व्यक्तींची विचारपूस करायच्या.’
– सुश्री (कु.) रश्मी परमेश्वरन् (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४७ वर्षे), केरळ (१३.७.२०२४)