गुरुकार्याप्रती समर्पित वृत्ती असलेले आणि साधकांना सेवेतून आनंद मिळावा, यासाठी अविरत प्रयत्न करणारे सनातनचे ११ वे संतरत्न पू. संदीप आळशी !
‘सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील एक महत्त्वपूर्ण संतरत्न म्हणजे पू. संदीप आळशी ! गुरुकृपेने त्यांचे प्रत्यक्ष मागदर्शन लाभणार्या आम्हा साधकांसाठी मात्र ते ‘पू. संदीपदादा’ आहेत. त्यांचे नाव घेताच मनाला आपोआपच आपुलकी आणि जिव्हाळा जाणवतो. कधी ते आश्रमात नसले, तर माझ्या मनात एक पोरकेपणाची जाणीव निर्माण होते. साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ते घेत असलेल्या कष्टामुळे तसे वाटत असावे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रंथांशी संबंधित सेवा करतांना लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये आणि अनुभूती श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. साधक चांगल्या प्रकारे सिद्ध व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे पू. संदीपदादा !
१ अ. विविध दृष्टीकोनांतून चिंतन करण्यास शिकवणे : पू. संदीपदादांनी आम्हाला ‘प्रत्येक सूत्राचे विविध दृष्टीकोनांतून चिंतन कसे करायचे ?’, ते शिकवले, उदा. शुद्धलेखन, तत्त्वनिष्ठा, राष्ट्रभक्ती, धर्मप्रेम, साधना, संतांना काय आवडेल ? आणि समष्टीच्या दृष्टीने कसा विचार करायचा ?’
१ आ. केवळ तांत्रिक संकलन नव्हे, तर योग्य विचारप्रक्रियाही शिकवणे : सेवा करतांना सहसाधकाला समजेल, असे पू. दादांचे शिकवणे असते. ते लिखाणात त्यांनी केलेल्या प्रत्येक पालटामागचा दृष्टीकोन समजावून सांगतात. परिणामी योग्य संकलनासह साधनेला अनुसरून उपयुक्त अशी योग्य विचारप्रक्रियाही शिकायला मिळते.
१ इ. साधकाला सेवेतून आनंद मिळावा, यासाठी साहाय्य करणे : त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधकाला ‘आनंदी राहून सेवा करता येईल’, याकडे पू. दादांचे लक्ष असते. ज्या वेळी साधकाला आवश्यकता असते, त्या वेळी ते स्वतःहून साहाय्य करतात, उदा. एखाद्या सेवेविषयी काही सुचत नसेल, तर ते त्या साधकाला त्या संदर्भातील १-२ सूत्रे सुचवतात. साधकाला आध्यात्मिक स्तरावरील उपायांची आवश्यकता असेल, तर त्याला उपाय करण्यास सांगतात.
१ ई. साधकाला लहान लहान उद्दिष्टे देऊन स्फूर्ती देणे : साधकांनी चांगली कृती केल्यावर पू. दादा त्यांचे कौतुक करतात. अधिक चांगली कृती असेल, तर प्रसाद देतात. साधकांच्या सेवेचा आढावा घेऊन ते साधकाला नियमित २ – ३ कृती करण्यास सांगतात आणि त्याचा परिणाम अभ्यासतात. त्यांनी सांगितल्यानुसार व्यष्टी वा समष्टी साधनेचे प्रयत्न करतांना कंटाळा आणि ताण येत नाही.
१ उ. साधकाचे संपूर्ण दायित्व स्वीकारणे : पू. दादांनी एखाद्या साधकाला सेवा दिल्यानंतर त्या साधकाचे पूर्ण दायित्वही ते स्वतःचेच समजतात. साधकाने केलेल्या चुका सुधारून परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असे लिखाण करतांना त्यांची कोणतीही तक्रार नसते. ते कार्यासमवेत त्या साधकाची व्यष्टी साधना चांगली व्हावी, यासाठी सर्व प्रकारे मार्गदर्शन करतात.
२. साधकाला शिकवलेल्या सूत्रांचा समष्टीला दीर्घकाळ लाभ व्हावा, यासाठी प्रयत्न करणे
वर्ष २०२० मध्ये ‘सनातन पंचांगाची सेवा करतांना पू. दादांनी प्रत्येक टप्प्याच्या वेळी माझ्या चुका मला लक्षात आणून दिल्या. चुका फलकावर लिहिणे, प्रायश्चित्त घेणे, यांसह सर्व चुका उपाययोजनांसह लिहून त्यांनी धारिका सिद्ध करण्यास सांगितले. ‘प्रत्येक वर्षी पंचांगाच्या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी पंचांगाचे संकलन करणार्या या धारिकेचा अभ्यास करावा’, असे त्यांनी सांगितले. ‘नवीन संकलकांना त्या चुकांतून शिकता येईल’, असा त्यांचा दृष्टीकोन होता.
३. पू. संदीपदादांनी प्रत्येक कलाकृती सात्त्विक आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने करणे
‘सनातन पंचांग’ किंवा अन्य कोणत्याही सात्त्विक उत्पादनांशी संबंधित लिखाण करायचे असेल, तेव्हा पू. दादा सतत नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. ते आम्हाला चौकटबद्ध विचारांच्या पलीकडे जाऊन विचार करायला सांगतात. प्रत्येक कलाकृती वा ग्रंथातील लिखाण अधिकाधिक चांगले आणि ‘वेळमर्यादेत कसे करता येईल ?’, यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी ते स्वतःच्या कृतीतून शिकवतात.
४. पू. दादांची लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये
४ अ. सतत सकारात्मक आणि उत्साही असणे : पू. दादांना आध्यात्मिक त्रास होतो. त्यासाठी ते नामजपादी उपाय करतात. त्या त्रासातही ते सतत सकारात्मक आणि उत्साही असतात. कितीही सेवा आली, तरी ते स्थिर राहून सर्व सेवा करतात.
४ आ. संकलनाची वृत्ती बनणे : पू. दादांचे संकलन उत्कृष्ट आहे. त्यामुळे एका पानाच्या लिखाणाचे सार ते अगदी ३ – ४ ओळींतही मांडू शकतात. त्यांना कोणताही विषय किंवा एखादी अडचण सांगितली, तर अगदी अल्प शब्दांत ती त्यांना पूर्णपणे कळते आणि त्याविषयीची उपाययोजनाही ते अगदी नेमक्या शब्दांत सांगतात. त्यामुळे साधकांचे अनावश्यक बोलणे वा समस्येला कवटाळून बसणे इत्यादी आपोआपच न्यून होते.
४ इ. कौशल्यपूर्ण नियोजन करणे : पू. दादा प्रत्येक सूत्राकडे गांभीर्याने पहातात. सूत्र तडीस जाईपर्यंत ते योग्य तो पाठपुरावा करतात. ‘कुणाला कोणती सेवा देऊ शकतो ? कोण सेवा अल्प वेळेत आणि अधिक चांगली करू शकते ?’ यांविषयीचा त्यांचा अभ्यास उत्तम आहे. उपलब्ध साधकसंख्या आणि साधकांची कार्यक्षमता यांची सुयोग्य सांगड घालण्याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते.
४ ई. गुरुकार्याप्रती समर्पित आणि इतरांना विचारण्याची वृत्ती : पू. दादांना परात्पर गुरु डॉक्टरांचे प्रत्येक कार्य ‘माझे’ वाटते. त्यामुळे त्यांना प्रत्येक कार्यातील नवीन पैलू, दृष्टीकोन इत्यादी सुचतात. पू. दादांनी आजवर सनातनच्या अनेक ग्रंथांचे संकलन केले आहे; मात्र ‘ग्रंथांशी संबंधित असे मला सर्व कळते’, असा त्यांचा भाग कधीच नसतो. ते प्रत्येक सूत्र संबंधित सेवेतील तज्ञ साधकांना विचारण्यास सांगतात.
४ उ. सूक्ष्मातील कळणे : एखाद्या साधकाला आध्यात्मिक त्रास होत असेल, तर त्या साधकाने काही सांगण्यापूर्वीच पू. दादांना ते कळते आणि ते लगेचच त्याला नामजपादी उपाय सुचवतात. २ – ४ दिवसांनी ते सहज विचारपूस करून त्या साधकाचा आढावाही घेतात.
५. पू. दादांच्या संदर्भातील काही अनुभूती
५ अ. पू. दादा सेवेच्या ठिकाणी येतांना आणि जातांना नित्य येणार्या अनुभूती
१. पू. दादा सेवेच्या ठिकाणी येतांना आणि जातांना त्यांची चालण्याची गती परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच असते.
२. पू. दादांना पाठीमागून पाहिल्यास ‘परात्पर गुरु डॉक्टरच चालत जात आहेत’, असे वाटते. प्रत्यक्षात परात्पर गुरु डॉक्टरांची उंची पू. दादांपेक्षा अधिक आहे; मात्र त्या दोघांत भेद नाही’, असे जाणवते.
५ आ. पू. दादा संकलनासाठी सोबत येऊन बसल्यानंतर येणार्या अनुभूती
१. पू. दादांच्या रूपात ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच शेजारी बसले आहेत’, असे जाणवते.
२. कधी कधी पू. दादा बोलत असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टरच आपल्याशी बोलत आहेत’, असे वाटते.
६. कृतज्ञता
सनातनच्या मार्गदर्शनाखाली शेकडो साधक साधना करत आहेत. त्यातील पुष्कळ अल्प जणांना संतांचा सहवास लाभला आहे. काही मोजक्या साधकांनाच संतांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभते. ग्रंथसेवा करणार्या आम्हा साधकांना मात्र पदोपदी मार्गदर्शन करणारे पू. दादा लाभले आहेत, हे आमचे परम भाग्य आहे.
परात्पर गुरु डॉक्टर, ‘आपलेच एक रूप असलेले पू. दादा साधकांना देऊन आपण आमच्या आध्यात्मिक कल्याणाची काळजी घेत आहात. यासाठी आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. पू. दादा करत असलेल्या मार्गदर्शनानुसार आम्हाला सेवा करता येऊन श्री गुरूंची कृपा संपादन करता यावी’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना !’
– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |