मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलतींविषयी विद्यापिठे आणि महाविद्यालये संभ्रमात !

राज्यातील विद्यार्थिनी उच्च शिक्षण प्रवेशापासून वंचित !

पुणे – राज्यशासनाने मुलींना शिक्षण आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलतीचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्याविषयी साशंक आहे, त्यामुळे या निर्णयाचा नेमका उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यशासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने इंजिनिअरिंग, फार्मसी, वैद्यकीय, हॉटेल व्यवस्थापक, आर्किटेक्चर (रचनाकार), कृषी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना मुलींना १०० टक्के शुल्क सवलत (खासगी, अभिमत विद्यापिठे वगळून) देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पारंपरिक अभ्यासक्रमांना मुलींसोबतच मुलांना १०० टक्के शुल्क सवलतीचा निर्णय वर्ष २०१७ पासून लागू करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना घोषित केला होता. प्रत्यक्षात या निर्णयाची, तसेच त्याच्या कार्यवाहीची माहिती विद्यापिठे आणि महाविद्यालये यांना नसल्याने, विद्यार्थी आणि मुली यांना प्रवेश नाकारला आहे. काही महाविद्यालयांकडून प्रवेशाच्या वेळीच पूर्ण शुल्क आकारून, त्यांना शासनाकडून सूचना आल्यानंतर शुल्क परत करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.