‘सनबर्न’ने हणजूण कोमुनिदादचे गेल्या २ वर्षांचे शुल्क अजूनही भरलेले नाही !

पणजी, १७ जुलै (वार्ता.) – गेली काही वर्षे ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स’ महोत्सवाचे वागातोर समुद्रकिनार्‍यावर आयोजन केले जात आहे. ‘सनबर्न’च्या आयोजकांनी हणजूण कोमुनिदादचे यापूर्वीचे ३८ लाख रुपये आणि गेल्या वर्षीचे ३ कोटी ४० लाख रुपये शुल्क अजूनही भरलेले नाही. ‘सनबर्न’ने हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात नेले आहे आणि त्यांचे अधिकोषातील खाते सध्या गोठवण्यात आलेले आहे, अशी माहिती हणजूण कोमुनिदादचे अध्यक्ष डॉम्निक परेरा यांनी दिली. (असे असूनही ‘सनबर्न’चे आयोजक दक्षिण गोव्यात यंदा महोत्सव भरवण्याची घोषणा करत आहेत. यावरून ते किती निर्ढावलेले आणि धनाढ्य असतील ते दिसून येते. – संपादक)

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने यापूर्वी एका निवाड्यात ‘सनबर्न’च्या आयोजकांकडून शुल्क आकारण्याचा कोमुनिदादच्या महासभेला (जनरल बॉडीला) अधिकार असल्याचा निवाडा दिला होता. त्यानंतर गतवर्षी हणजूण कोमुनिदादच्या वार्षिक महासभेत ‘सनबर्न’ला प्रति चौरस मीटर ५० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय झाला. यामुळे २ कोटी ४३ लाख १४ सहस्र ६०७ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षी हणजूण कोमुनिदादच्या ना हरकत दाखल्याविना वागातोर येथे सरकारच्या सहकार्याने सनबर्नचे आयोजन करण्यात आले होते. (याचा अर्थ कोमुनिदादच्या अधिकारांना काहीच अर्थ नाही, असा होतो. – संपादक) या वेळी हणजूण कोमुनिदादने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात धाव घेतली आणि यानंतर आयोजकांनी ‘डिमांड ड्राफ्ट’ सुपुर्द केल्यावर कोमुनिदादने त्यांना ना हरकत दाखला दिला. हणजूण कोमुनिदादचे अध्यक्ष डॉम्निक परेरा पुढे म्हणाले, ‘‘सनबर्न’च्या आयोजकांनी गतवर्षीचे शुल्क घटवून ते ७० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव हणजूण कोमुनिदादकडे ठेवला होता आणि या बदल्यात सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केलेले प्रकरण मागे घेण्याची हमी दिली होती. शुल्क निश्चित करण्याचा अधिकार हा कोमुनिदादच्या महासभेचा (जनरल बोडी) आहे.’’ हणजूण कोमुनिदादचे गावकर डॉ. फेतोंन डिसोझा म्हणाले, ‘‘सनबर्न’चे आयोजन करून आयोजक नफा कमावत असतात, मग कोमुनिदादचे शुल्क ते भरत नाहीत. आयोजन प्रतिवर्षी अमूक ठिकाणी ‘सनबर्न’ होणार असे घोषित करतात; मात्र शेवटी वागातोर येथेच ‘सनबर्न’चे आयोजन करतात.’’

‘सनबर्न’ला राज्यात कुठेही अनुमती देऊ नका ! – काँग्रेस

पणजी – सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणे, अमली पदार्थांची विक्री करणे, ध्वनी आणि वायू प्रदूषण, महोत्सवात सहभागी होणार्‍यांचा मृत्यू होणे आदी कारणांमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या ‘सनबर्न’ला राज्यात कुठेही अनुमती देऊ नये, अशी मागणी काँग्रेस पक्षाने गोवा राज्याचे मुख्य सचिव, दोन्ही जिल्हाधिकारी आदींकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांच्या अतीसेवनाने निधन झालेल्या घटना, ‘सनबर्न’मध्ये घातलेल्या धाडीत सापडलेले अमली पदार्थ आदी अनेक सूत्रांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसचे माजी महासचिव जनार्दन भंडारी यांनी ही माहिती दिली आहे.