‘संगीताच्या माध्यमातून योग, म्हणजेच ईश्वरप्राप्ती’ याविषयी ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांना देवाने सुचवलेले विचार !

‘एकदा मी ‘संगीताच्या (गायन, वादन आणि नृत्य या) माध्यमातून योग कसा साधला जातो ?’ याविषयी विचार करत होतो. तेव्हा ‘देवाने मला ‘संगीताच्या माध्यमातून योग’, यासंबंधीचे ज्ञानच दिले’, असे मला जाणवले. याविषयीचे देवाने मला सुचवलेले विचार येथे दिले आहेत.

१. संगीत ही द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजेच ईश्वरप्राप्तीकडे नेणारी वाट असणे

‘संगीतकला ही योगमार्गाने ईश्वराकडे नेणारी एक जवळची वाट आहे. ती द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजेच ईश्वरप्राप्तीकडे नेणारी वाट आहे. ‘वेदानां सामवेदोऽस्मि ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २२), म्हणजे ‘वेदांमध्ये मी (ईश्वर) सामवेद आहे’ किंवा ‘नाहं वसामि वैकुण्ठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ।।’ – पद्मपुराण, उत्तरखण्ड, अध्याय ९२, श्लोक २२, म्हणजे भगवंत म्हणतो, ‘हे नारदा, मी वैकुंठात, योगीजनांच्या हृदयात किंवा सूर्यावरही रहात नाही. माझे भक्त जेथे एकाग्रतेने माझे भजन गातात, तेथेच मी सर्वकाल वास करतो.

म्हणजेच ‘भक्ताने प्रेमाने केलेली संगीतसेवा मला अतिशय प्रिय आहे’, असे स्वतः परमेश्वरानेच सांगितले आहे.

२. कलाकार आपल्या कलेशी तादात्म्य पावतो, तेव्हा तो ‘योग’ साधतो !

श्री. मनोज सहस्रबुद्धे

दोन वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जाऊन एकरूप होतात, तेव्हा त्याला ‘योग’ म्हटले जाते, उदा. गायक गाण्यातील शब्दांचे अर्थ आणि सूर, वादक वाद्यातून निघणारे स्वर अन् नर्तक पदन्यास आणि मुद्रा यांच्याशी एकरूप होतो, म्हणजेच कलाकार स्वत:च्या कलेशी तादात्म्य पावतो, तेव्हा तो ‘योग’ साधतो.

३. कलेला भावाची जोड दिल्यास कलाकाराचा ईश्वरप्राप्तीच्या दिशेने प्रवास अधिक वेगाने चालू होणे

आरंभी कलाकार नवखा असतो, तेव्हा तो ‘स्वतःला कलेच्या प्रस्तुतीकरणाची संधी मिळावी आणि कलेचे प्रस्तुतीकरण सुंदर व्हावे’, ही इच्छा मनाशी धरतो. त्याला प्रस्तुतीकरणाची संधी िमळू लागल्यावर पुढे तो ‘प्रसिद्धी, पैसा आणि कालांतराने मान-सन्मान मिळावा, प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वरचढ असावे’, अशा अनेक तणावात्मक विचारांच्या गर्तेत सापडतो. त्याच्या प्रारब्धानुसार त्याला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान या गोष्टी मिळतात; परंतु कलाकाराने कलेला भावाची जोड दिल्यास, म्हणजेच कला आणि ईश्वराप्रतीचा भाव किंवा ईश्वरप्राप्तीची तळमळ हे एकत्रित जोडल्यावर ‘योग’ साधला जाऊन त्याला आपोआपच ईश्वराची अनुभूती येते. यामुळे कलाकाराचा ईश्वरप्राप्तीच्या दिशेने अधिक वेगाने प्रवास चालू होतो.

४. कलेच्या माध्यमातून ईश्वराची आराधना करतांना कलाकार अंतर्मुख होत असणे आणि ते ऐकणाराही अंतर्मुख होणे

व्यवहार म्हणून कला सादर करण्यार्‍या कलाकाराला कलेला भावाची जोड देणे कठीण जाते; म्हणून तो प्रसिद्धी, पैसा, मान-सन्मान यांतच गुरफटत जातो आणि बहीर्मुख होतो; पण भगवंतासाठी कला सादर करणार्‍या कलाकाराला पैसा, प्रसिद्धी किंवा मानसन्मान यांच्याशी काहीही देणेघेणे नसते. त्याला ‘कलेच्या माध्यमातून ईश्वराची आराधना करणे’, हाच एक ध्यास असतो. त्यामुळे तो कलाकार ‘कलेला भाव जोडणे आणि अंतर्मुखता साधणे’, या क्रिया अधिक वेगाने करू शकतो. हृदयात उत्पन्न होणार्‍या भावलहरी संगीताच्या लहरींना जोडल्यामुळे कलाकार अंतर्मुख होतोच; परंतु ऐकणाराही अंतर्मुखता होतो.

५. कलाकार कलेशी भावाच्या स्तरावर तादात्म्य पावल्यावर त्याला अष्टसात्त्विक भाव जागृत झाल्याची अनुभूती येणे

कलाकाराचे मन सूर, स्वर आणि मुद्रा यांच्याशी जोडले जाते, त्याच क्षणी त्याला ‘डोळ्यांतून भावाश्रूृ येणे’, ‘सुगंध येणे’, अशा अनूभूती येऊ लागतात. ‘कलाकाराचे असे अधूनमधून अष्टसात्त्विक भाव जागृत झाले, म्हणजे त्याला परमेश्वरप्राप्ती झाली’, असे म्हणता येणार नाही; मात्र ‘त्याचा ईश्वरप्राप्तीच्या दिशेने प्रवास चालू झाला’, असे म्हणता येईल. अशा भावस्थितीत राहिल्यास त्याला आणखी वरच्या स्तराच्या, म्हणजे स्पर्श जाणवणे, सूक्ष्म नाद ऐकू येणे किंवा सहस्रारातून सर्व शरिरात स्पंदने पसरत गेल्याची किंवा मूलाधारचक्रातून आनंददायी स्पंदने स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, आज्ञा या चक्रांवर जात असल्याची अनूभूती येऊ शकते.

६. कलेतही योग्य आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असणे

कलेच्या माध्यमातून साधनेची दिशा दाखवणारा योग्य गुरु योग्य वेळी न भेटल्याने कलाकार पैसा किंवा प्रसिद्धी यांच्यामागे लागून बहिर्मुख होतो. त्यामुळे कित्येक चांगले कलाकार अहंकारी आणि व्यसनाधीन झालेले दिसून येतात; म्हणून कलेतही योग्य वेळी, योग्य आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक असते.

७. कलाकाराला आनंदावस्था प्राप्त होण्यातील टप्पे

७ अ. गुरु किंवा देवता यांच्यावरील बंदीश सतत म्हटल्यावर कलाकार भावस्थितीत जाऊ शकणे : कलाकाराला त्याचे आराध्य दैवत किंवा गुरु प्रिय असल्यामुळे कलाकाराला त्यांच्या प्राप्तीची तळमळ असते. त्यामुळे गाण्यात गुरु किंवा देवता यांच्याशी संबंधित असलेल्या शब्दांमुळे कलाकार भावाच्या स्तरावर लवकर जाऊ शकतो, उदा. गुरु आणि देव यांवरील बंदीश (टीप) गातांना कलाकार भावस्थितीत जातो.

(टीप – ‘शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणार्‍या आणि अर्थपूर्ण शब्दरचना असलेल्या गीताला बंदीश’, असे म्हणतात.)

७ आ. सतत भावस्थितीत राहिल्यावर श्री गुरूंशी असलेला द्वैतभाव संपून अद्वैताची अनुभूती येणे : वारंवार गुरु आणि देवता यांच्यासंबंधी गायन, नृत्य किंवा वादन केल्याने अंतर्मनावर त्याचा ठसा उमटतो. या टप्प्याला तो द्वैतभावात (म्हणजेच मी आणि परमेश्वर वेगळा आहे) असतो; परंतु जसजसा कलाकाराचा भाव वाढत जातो, तसतसा कलाकाराचा त्याचे आराध्य दैवत किंवा गुरु यांच्याविषयीचा द्वैतभाव संपून तो त्यांच्याशी पूर्णत: एकरूप होतो, म्हणजेच अद्वैत भावात जातो. तेव्हा तो स्वतःचे अस्तित्व पूर्णतः विसरतो.

७ इ. अद्वैत स्थितीत जाणे, म्हणजेच ईश्वरप्राप्ती होऊन आनंदावस्था प्राप्त होणे : सतत भावावस्थेत राहून त्याचा मनोलय आणि बुद्धीलय होतो. तो ‘चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ।’, म्हणजे ‘मी चिदानंदरूप शिव आहे’, या अवस्थेला पोचतो. तेव्हा ‘त्याला ईश्वरप्राप्ती झाली’, असे म्हणता येईल. अद्वैतात कलाकार आणि त्याची कला या दोन वेगळ्या गोष्टी रहातच नाहीत. कलाकार आत्मभान विसरून आपल्या कलेत रममाण होतो. स्थळ, काळ, वेळ, देहबुद्धी विसरून तो परमोच्च अशी आनंदावस्था अनुभवतो.

‘देवाने मला वरील विचार सुचवले’, यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

–  श्री. मनोज सहस्रबुद्धे, (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) वाद्य अभ्यासक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक