अंतर्मुख होण्याचा आणि अभ्यास करण्याचा उत्तम काळ म्हणजे चातुर्मास !
१७ जुलै २०२४ या दिवशीपासून ‘चातुर्मास प्रारंभ’ झाला आहे. त्या निमित्ताने…
देवशयनी (आषाढी) एकादशीपासून देवउठी (कार्तिक) एकादशीपर्यंत चातुर्मास आहे. हा आध्यात्मिक खजिना भरण्याचा काळ आहे. पावसाळ्याच्या दिवसात भूक अधिक लागत नाही; म्हणून उपवास किंवा एक वेळ भोजन केले जाते. जीवशक्ती अन्न पचवण्यात अधिक व्यय झाली नाही, तर ती संग्रही राहील. श्रावण मासात अनुष्ठान इत्यादी करण्याचे ऋषींनी विधान केले आहे. या दिवसांमध्ये आपण स्वतःची ईश्वराप्रतीची निष्ठा वाढवावी. आठवडा, २ आठवडे, ४ आठवडे असा एखादा नियम करून इंद्रियांच्या लालन-पालनात गर्क न होता जीवन साधे ठेवत आपल्या सुखस्वरूप अंतर्मुख आत्मा-परमात्म्यात येण्याचा अभ्यास करा. ज्ञान ऐकल्याने मोक्ष मिळत नाही, तर ते ऐकल्यानंतर त्यात स्थित झाल्याने (आचरण केल्याने) मुक्तीचा अनुभव येतो. जर ऐकलेले ज्ञान पचवण्यासाठी वेळ काढला नाही, तर जो परमपदाच्या प्राप्तीचा लाभ झाला पाहिजे, त्यापासून तुम्ही वंचित रहाता.
साधनेसाठी अमृततुल्य असा चातुर्मास काळ !
शास्त्र सांगते की, आपण वेदांचे ज्ञान जितके श्रवण केले आहे, त्याच्या १० पट त्याचे मनन केले पाहिजे. १० पट, म्हणजे श्रवणाच्या १०० पट निदिध्यासन केले पाहिजे. मनन होण्याचे फळ काय ? तर आत्म्याप्रती आणि स्वतःच्या स्वरूपाप्रती जी शंका होती, ती थोडी थोडी आपोआप निवृत्त होत जाते. निदिध्यासन होण्याचे फळ काय ? तर आनंद मिळतो. साधनेसाठी अमृततुल्य अशा चातुर्मास काळाचा लाभ घेऊन परमात्माप्राप्तीच्या पथावर शीघ्रतेने अग्रेसर व्हा !’
(साभार : ‘ऋषिप्रसाद’, १० जुलै ते ५ नोव्हेंबर २०२३)