सनातनचे १२८ वे संतपद प्राप्त करणार्या कै. पू. (श्रीमती) सौदामिनी माधवन् कैमल (वय ८२ वर्षे) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
आज १८.७.२०२४ या दिवशी पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल यांच्या देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
(कु. अदिती सुखटणकर यांचे लिखाण कै. (श्रीमती) सौदामिनी माधवन् कैमल यांनी संतपद प्राप्त करण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख केवळ सौदामिनी अम्मा असा केला आहे. – संकलक)
‘श्रीमती सौदामिनी कैमल यांना केरळ येथील साधक प्रेमाने ‘अम्मा’ असे म्हणायचे. गेल्या १ वर्षापासून कैमलअम्मांची प्रकृती खालावत चालली होती. त्यांचे पाय दुखत असल्यामुळे त्यांना चालायला त्रास व्हायचा. काही मासांपासून त्या स्वतःचे काही करू शकत नव्हत्या. त्यामुळे साधकांना त्यांना वैयक्तिक गोष्टींसाठी साहाय्य करावे लागायचे. मला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. प्रेमभाव
सौदामिनी अम्मांमध्ये पुष्कळ प्रेमभाव होता.
२. अखंड नामजप करणे
सौदामिनीअम्मा सकाळी अंघोळ झाल्यावर १० – ११ वाजल्यापासून ते रात्री ८ – ८.३० वाजेपर्यंत (म्हणजे रात्रीचा महाप्रसाद ग्रहण करेपर्यंत) ध्यानमंदिरात बसून रहायच्या. ध्यानमंदिरात नामजप लावलेला असायचा. तो ऐकत त्या नामजप करायच्या. हा दिनक्रम जवळजवळ वर्षभर होता. त्या तो नियमित पाळायच्या. कधी दुपारी थोडी विश्रांती घेण्यास किंवा त्यांना बरे वाटत नसेल, तर थोडे झोपायला सांगितले, तरीही त्या सिद्ध व्हायच्या नाहीत.
३. त्यागी वृत्ती
सौदामिनीअम्मांना काही काळापासून ‘त्या देह सोडणार’, असे बहुतेक जाणवले असावे; म्हणून त्यांनी निधनापूर्वी अंदाजे १ मास आधी त्यांच्याकडील साड्या केरळ येथील साधिकांसाठी काढून ठेवायला सांगितल्या. आश्रमात आलेल्या प्रत्येक साधिकेला त्यांनी साडी आठवणीने दिली. त्यांनी घरी रहाणारी माझी आई आणि बहीण यांच्यासाठीही त्यांच्याकडील साड्या काढून ठेवल्या होत्या.’
– कु. अदिती सुखटणकर, केरळ (१४.७.२०२४)
‘शेवटच्या श्वासापर्यंत सेवा व्हावी’, ही तळमळ असलेल्या आणि सनातनचे १२८ वे संतपद प्राप्त करणार्या कै. (श्रीमती) सौदामिनी माधवन् कैमल !
केरळ येथील त्रिश्शिवपेरूर जिल्ह्यात रहाणार्या श्रीमती सौदामिनी कैमल यांनी आरंभी घरी एकटीने राहून साधना केली. घरी साधनेत कुणाचे मार्गदर्शन नसतांनाही त्यांनी संतांचे आज्ञापालन करून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवली आणि वर्ष २०१२ मध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. मागील ८ वर्षांपासून त्या कोची, केरळ येथील सेवाकेंद्रात राहून साधना करत होत्या. ‘प्रेमभाव’ हा श्रीमती कैमलआजींचा स्थायीभाव होता. त्यांना सर्व साधकांप्रती निरपेक्ष प्रेम वाटायचे. सर्वांशी आईच्या मायेने वागणार्या आजी सर्वार्थांनी साधकांच्या ‘अम्मा’ झाल्या आणि साधकांचा आधारस्तंभ बनल्या.
अनेक वर्षांपासून आजी प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून नामजप करायच्या. उतारवयात आश्रमजीवन अंगीकारूनही स्वावलंबन, शिस्तबद्ध दिनक्रम आणि नियोजनबद्ध कृती करणे आदी गुणांमुळे त्या सेवाकेंद्रातील जीवनात समरस झाल्या होत्या.
६.७.२०२४ या दिवशी कैमलआजींनी देहत्याग केला. ‘साधनेचे गांभीर्य’, ‘चिकाटी’, ‘तळमळ’, ‘देवावरील श्रद्धा’ आणि ‘भाव’ या गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत राहिली. वर्ष २०२३ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६९ टक्के होती. आता कैमलआजींनी ७१ टक्के पातळी गाठून ‘व्यष्टी संत’ म्हणून सनातनचे १२८ वे संतपद प्राप्त केले आहे. पू. आजींचे सुपुत्र श्री. नंदकुमार कैमल हेही पूर्णवेळ साधना करत असून त्यांचीही आध्यात्मिक उन्नती चांगल्या गतीने होत आहे.
देहत्यागानंतरही ‘पू. कैमलआजींची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत राहील’, याची मला खात्री आहे.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१७.७.२०२४)