संपादकीय : काश्मीर पुन्हा रक्तबंबाळ !
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १-२ महिन्यांपासून चालू असलेली जिहादी आक्रमणे काँग्रेसच्या राजवटीची आठवण करून देणारी आहेत. ‘काँग्रेसच्या राजवटीत ज्याप्रमाणे जिहादी आतंकवाद फोफावला होता, त्याप्रमाणे आताही तो पुन्हा डोके वर काढत आहे का ?’, असे वाटण्याजोगी सध्याची परिस्थिती आहे. ‘काश्मीरमधील जिहादी आतंकवाद संपला आहे’, ‘तेथे सर्व आलबेल आहे’, ‘शांतता आहे’, असे आतापर्यंत करण्यात आलेले दावे किती फोल आहेत, हे काश्मीरमध्ये प्रतिदिन होणार्या आतंकवादी आक्रमणांवरून दिसून येते. काश्मीरमध्ये ३५ दिवसांत आतंकवाद्यांनी ५ मोठी आक्रमणे केली आहेत. आतंकवाद्यांच्या या हिंसक कृतीला आक्रमण जरी म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात ते युद्ध आहे, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. कुठल्याही समस्येच्या मुळाशी न जाण्याची आपली गेल्या ७५ वर्षांतील मानसिकता आतंकवाद्यांचे मनोबल वाढवणारी आहे. आतापर्यंत आपल्याला हेच सांगितले गेले की, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० अस्तित्वात असल्यामुळे तेथे आतंकवाद फोफावत आहे; परंतु आता तर हे कलम हटवून ५ वर्षे झाली आहेत, तरीही काश्मीर खोरे रक्तबंबाळ का आहे ?, या प्रश्नाचे उत्तर पुन्हा तेच, म्हणजे ‘समस्येच्या मुळाशी न जाणे’, हे आहे. कलम ३७० हटवण्याने काश्मीरमधील आतंकवाद काही प्रमाणात आटोक्यात आला, हे निश्चित; पण तो संपलेला नाही, हेही निश्चित ! मग त्यावर सरकारी यंत्रणांकडे काय उपाययोजना आहे ? एकमेव ‘लक्ष्यित आक्रमण’(सर्जिकल स्ट्राईक) सोडले, तर आपण आतंकवादाविरुद्ध कुठली ठोस कारवाई केली आहे ? आक्रमण झाल्यावर ते परतवून लावणे वेगळे आणि आतंकवादाचे उच्चाटन अन् आतंकवाद्यांचा निःपात करणे वेगळे. आतंकवाद्यांची आक्रमणे आपले शूर सैनिक यशस्वीपणे परतवून लावतच आहेत; पण ती होऊच नयेत, यासाठी गेल्या ७५ वर्षांत राजकीय पटलावरून काय प्रयत्न झाले ?, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे. आता जम्मू-काश्मीरमध्ये एकाएकी आक्रमणे कशी वाढली ?, याचा अभ्यास होणे आवश्यक आहेच; पण त्याच्याच जोडीला ही आक्रमणे परतवण्यासह ती होऊच नयेत, यासाठी उपाययोजना काढून त्याचा कृती आराखडा सिद्ध करणे अधिक आवश्यक आहे. तो अस्तित्वात आहे, असे आज तरी म्हणता येणार नाही; म्हणूनच तर उरीसारखी आक्रमणे होतात; पण आतंकवाद्यांच्या उरात धडकी भरवणारी कारवाई होतांना दिसत नाही. केलीच, तर ती तेवढ्यापुरती असते. असे का ?, या प्रश्नाचे उत्तर पुन्हा तेच, ‘समस्येच्या मुळाशी न जाणे !’ आतंकवादाच्या समस्येचे मूळ ‘जिहाद’मध्ये आहे आणि नेमकी तो संपवण्यासाठी आपल्याकडे गेल्या ७५ वर्षांत कुठलीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. जिहाद म्हणजे धर्मयुद्ध ! यांतर्गत ‘देशावर केवळ स्वतःचीच राजवट असायला हवी’, या अतिरेकी विचारातून सर्वत्र हिंसा केली जाते. म्हणूनच तर लेखाच्या आरंभीच म्हटले आहे की, ‘आपण आतंकवादी कृत्यांकडे केवळ आक्रमण म्हणून पहातो; पण त्याकडे प्रत्यक्षात युद्ध म्हणून पाहिले पाहिजे.’ जिहादी आतंकवादामुळे आज संपूर्ण जग, विशेषतः युरोपमधील देशसुद्धा त्रस्त आहेत. अनेक देशांनी आतंकवाद पसरवणार्या धर्मांधांवर कठोर निर्बंध घातले आहेत. आपल्याकडे जिहादी आतंकवाद देशाच्या मुळावर उठला असतांना काँग्रेससारखे पक्ष मात्र मतपेढीचे राजकारण करण्यात मग्न आहेत. काश्मीरमध्ये आतंकवाद फोफावण्यास काँग्रेसच सर्वस्वी उत्तरदायी आहे. गेल्या ७५ वर्षांत देशाच्या एका भागातील आतंकवादही संपवू न शकणे, हे सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे.
स्थानिकांची रसद तोडा !
काश्मीरमधील आतंकवादाच्या समस्येला दुसरी बाजूही आहे आणि ती म्हणजे आतंकवाद्यांना मिळणारे स्थानिकांचे साहाय्य !हे ठाऊक असूनही गेल्या ७५ वर्षांतील कुठलेही सरकार या राष्ट्रघातकी लोकांना रोखू शकलेले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त आहे. अशात आतंकवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर ते स्थानिकांच्या घरात आश्रय घेतात आणि तेथून आतंकवादी कारवाया करतात. चकमकीत जर आतंकवाद्यांसह त्याला आश्रय देणारा कुठला स्थानिक नागरिक मारला गेला, तर ‘सामान्यांना ठार मारले जाते’, असा अपप्रचार केला जातो. त्यामुळे ही समस्या अधिक गुंतागुंतीची बनते. प्रचलित न्यायप्रणालीमध्ये गुन्हेगाराच्या मूकसंमतीदारालाही गुन्हेगारच मानण्यात आले आहे. मग आतंकवाद्यांना आश्रय देणारे हे आतंकवादाचे मूकसंमतीदार नाहीत का ? त्यामुळे सरकारने आतंकवाद्यांसह त्यांच्या आश्रयदात्यांनाही आतंकवादी घोषित करून त्याप्रमाणे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. आता काश्मीरमधील आतंकवादाच्या रोगावर वरवरची मलमपट्टी करून उपयोगाची नाही, तर कठोर कारवाईरूपी शस्त्रक्रियाच करावी लागेल.
पाकिस्तानला धडा शिकवा !
जम्मू-काश्मीरमधील आतंकवादामागे पाकिस्तान आहे, हे आता सर्व जगाला ठाऊक आहे. तरीही आपण पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडण्याव्यतिरिक्त काहीही कारवाई केलेली नाही. एवढेच काय; पण मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणासह अनेक कृत्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे ‘ट्रकभर’ पुरावे मिळूनही आपण चेतावणी देण्यापलीकडे काहीही केले नाही. पाकिस्तानला भारताविरुद्ध जिहाद करायचा असल्याने तो हिंदूंना वेगवेगळ्या मार्गाने डिवचत असतो. आतापर्यंत काश्मीरपर्यंत सीमित असलेला आतंकवाद आता हिंदूबहुल जम्मूत पोचला आहे. अलीकडची बहुतांश सर्वच आतंकवादी आक्रमणे ही जम्मू आणि परिसरात झाली आहेत. आताही अमरनाथ यात्रा चालू असतांना पाकिस्तानी आतंकवाद्यांनी तेथे आक्रमणे करून हिंदूंच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, हे उघड आहे. काहीही करून हिंदूंच्या यात्रा सुखरूपपणे पार पडू द्यायच्या नाहीत, हीच जिहाद्यांची मानसिकता आहे. कावड यात्रेकरूंवरील आक्रमणे, नवरात्रीच्या मिरवणुकांवरील आक्रमणे आदींमध्ये नेहमी का आक्रमणे होतात ?, याचे उत्तर याच्यात आहे. एकूणच काय, तर एकेका आतंकवाद्याला संपवून काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही, तर जिहादला संपवणे, हाच प्रभाव आहे. पंतप्रधानांनी पाकिस्तानविषयी ‘ना आँख दिखायेंगे, ना आँख झुकायेंगे’, असे म्हटले होते; परंतु या चांगुलपणाला पाकिस्तान बधत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्याला समजेल, अशा भाषेत उत्तर दिले पाहिजे. शत्रू केवळ आक्रमण करत नसून त्याने युद्ध पुकारले आहे, हा दृष्टीकोन ठेवून कृती करण्यातच राष्ट्रहित आहे !
संपादकीय भूमिका :काश्मीरमधील आतंकवादरूपी रोगावर वरवरची मलमपट्टी नव्हे, तर कठोर कारवाईरूपी शस्त्रक्रियाच करणे आवश्यक ! |