संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा बाजीराव विहीर येथे रिंगण सोहळा !
पंढरपूर – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण बाजीराव विहीर (तालुका पंढरपूर) येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत १५ जुलै या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडले. हे रिंगण पहाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी प्रशासनाकडूनही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच आरोग्य विभागाच्या वतीनेही भाविकांसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बाजीराव विहीर येथे पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वाने २ फेर्या मारल्यानंतर माऊलींच्या अश्वाच्या खुराने उधळलेली माती स्वत:च्या कपाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. सर्व दिंड्या माऊलींच्या पालखीच्या पुढे भजन करत निघाल्या होत्या. फुगडी खेळत, मनोरे करून पखवाज वाजवत असे विविध खेळ खेळत वारकर्यांनी या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. १६ जुलैच्या रात्री सर्व दिंड्या पंढरपूर येथे आल्या आहेत. १७ जुलैच्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासकीय महापूजा करतील.