दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला जामीन; अंगणवाडी सेविकांचे आंदोलन परत चालू…

सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला जामीन

मुंबई – अभिनेता सलमान खान याला जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्णोई याच्याशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजस्थानस्थित युट्यूबरला अतिरिक्त महानगरदंडाधिकार्‍यांनी १५ जुलै या दिवशी जामीन संमत केला.

बनवारीलाल गुज्जर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याने यूट्यूब चॅनेलवरून सलमान याला धमकी दिली होती. त्याच वेळी त्याचे लॉरेन्स बिश्णोई, गोल्ड ब्रार आणि इतर गुंड यांच्याशी असलेल्या संबंधांविषयीही सांगितले होते.


अंगणवाडी सेविकांचे आंदोलन परत चालू

मुंबई – अंगणवाडी सेविकांचे असहकार आंदोलन चालू झाले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे. वर्षाच्या आरंभीच केलेल्या ५२ दिवसांच्या राज्यव्यापी संपाच्या वेळी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या मागण्यांसाठी असहकार आंदोलन पुकारले आहे.


पंढरपूर येथे बसस्थानक आणि यात्री निवास याचे उद्घाटन

पंढरपूर – एस्.टी. महामंडळाच्या पंढरपूरमधील जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटांचे ‘चंद्रभागा यात्रा बसस्थानक’ आणि त्याला जोडूनच १ सहस्र भाविक क्षमतेचे यात्री निवास उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.