वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्याचा आदेश !
पुणे – वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण थांबवण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आला. ‘लाल बहादूर प्रशासकीय अकादमी’ यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यशासनाने ही कारवाई केली. यासह पूजा खेडकर यांना २३ जुलैपूर्वी ‘मसुरी’ (उत्तराखंड) येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये उपस्थित रहाण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एखाद्या प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी स्थगित केल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.
पूजा खेडकर यांच्या सर्व प्रकरणांचा अहवाल पोलीस महासंचालकांनी मागवला !
पूजा खेडकर यांनी खासगी गाडीवर विनाअनुमती लावलेला ‘अंबर दिवा’, खेडकरांच्या आई मनोरमा यांनी शेतकर्याला पिस्तुलाचा दाखवलेला धाक आणि पूजा यांनी मिळवलेले दिव्यांग (अपंग) प्रमाणपत्र, या घटनांचा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला आहे. पूजा खेडकर यांनी भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी अपंग प्रमाणपत्र सादर केले होते. त्यांनी वेगवेगळी अपंग प्रमाणपत्रे मिळवल्याचे आरोप आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘दिव्यांग संघटने’ने राज्य अपंग कल्याण आयुक्त डॉ. प्रवीण पुरी यांच्याकडे केली आहे. त्यानंतर डॉ. पुरी यांनी या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करावे, असे पुणे पोलिसांना सांगितले होते. आता खेडकर यांना अपंग प्रमाणपत्र कुणी दिले ?, याची चौकशी चालू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
माझ्याविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे ! – पूजा खेडकर
‘माझ्याविषयी प्रतिदिन नवनवीन खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे. यामुळे माझी अधिक अपकीर्ती होत आहे. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कुणाचाही यात नकारात्मक हस्तक्षेप होऊ नये, यासाठी चौकशी समितीतील माहिती गुप्त ठेवली जाते,’ असे पूजा खेडकर म्हणाल्या.