वेंगुर्ला बसस्थानकातील प्रसाधनगृह पुन्हा चालू !
‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ने प्रसाधनगृह चालू करण्यासाठी घेतला पुढाकार
सावंतवाडी – येथील वेंगुर्ला बसस्थानकातील प्रसाधनगृह भर पावसाळ्यामध्येच बंद करण्यात आले होते. यामुळे स्थानकावरून नियमित प्रवास करणारे असंख्य विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि स्थानिक व्यापारी यांची मोठी गैरसोय होत होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ने ४ दिवसांमध्ये सावंतवाडी नगरपरिषद, आगार व्यवस्थापक आणि स्थानिक व्यापारी यांच्या सहकार्याने हे प्रसाधनगृह दुरुस्त करून प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा चालू केले आहे. यासाठी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि राजू मसुरकर यांनी सावंतवाडी नगर परिषदेचे स्वच्छता अधिकारी दीपक मापसेकर अन् स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांचे सहकार्य मिळवून दिले, तसेच नगरपरिषद कर्मचार्यांच्या साहाय्याने सदर प्रसाधनगृहाची स्वच्छता केली. हे प्रसाधनगृह प्रतिदिन स्वच्छ ठेवण्याचे दायित्व आगार व्यवस्थापकांनी स्वीकारले आहे.
‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी आगार व्यवस्थापक नीलेश गावित यांनी ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ला आभार पत्र देऊन आभार मानले आहेत.
संपादकीय भूमिकाएका सामाजिक संस्थेला असे करावे लागणे प्रशासनाला लज्जास्पद ! सामाजिक संस्थेला जे जमते ते नगरपालिका आणि नगर परिषद यांना का जमत नाही ? तेथे निवडून येणार्यांना याची लाज वाटली पाहिजे ! |