श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे दक्षिणद्वार सोहळा !
नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – धरणक्षेत्रात सातत्याने पडणार्या पावसाने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे १६ जुलैला पहाटे ४ वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. सोहळा होताच मंदिर समितीच्या वतीने भोंगा वाजवण्यात आला. या सोहळ्याची वाट १५ जुलैपासून मुंबई, पुणे, गोवा, तसेच परिसरात शेकडो भक्तगण पहात होते. या सर्वांनी नदीत स्नान करून याचा लाभ घेतला. या प्रसंगी ‘दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, अशा नामघोषात भक्तांनी मंदिराची प्रदक्षिणा केली.
‘दक्षिणद्वार सोहळा’ म्हणजे काय ?
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वहाणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वहाते. जेव्हा कृष्णा नदीचे पाणी वाढते, तेव्हा हे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून मुख्य गाभार्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करून मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडते. यालाच ‘दक्षिणद्वार सोहळा’, असे म्हणतात. श्रींच्या चरणांवरून येणार्या कृष्णा प्रवाहात स्नान केल्याने पापांचा नाश होऊन पुण्याची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने भाविकांनी या सोहळ्यासाठी गर्दी केली होती.