शिक्रापूर (पुणे) येथील घटना कर्णकर्कश आवाजाची बुलेट अडवल्यामुळे
वाहतूक पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी !
शिक्रापूर (पुणे) – शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकामध्ये वाहतूक पोलिसांचे वाहतूक नियमन चालू होते. त्या वेळी कर्णकर्कश आवाज करत एक ‘बुलेट’ गाडी आली. त्याला अडवल्याने गाडीचालक प्रतीक आढाव याने पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. त्या वेळी दादा चव्हाण त्या ठिकाणी आला. ‘ही माझी बुलेट आहे. तुम्ही घेऊन जायची नाही. प्रतीक माझा मित्र आहे. त्याला कुणी हात लावला, तर चौकात गोळ्या घालीन’ अशी धमकी देत पोलिसांशी हुज्जत घातली. (पोलिसांची धमक अल्प झाल्याने कायदा मोडूनही आरोपी गोळ्या झाडण्याची धमकी देतो, हे पोलिसांना लज्जास्पद !- संपादक) या प्रकरणी प्रतीक आढाव आणि दादा चव्हाण या दोघांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.