BSNL TATA DEAL : टाटा आणि बी.एस्.एन्.एल्. यांच्यामधील करारामुळे जिओ अन् एअरटेल या आस्थापनांना फटका बसणार !
मुंबई – खासगी दूरसंचार आस्थापन जिओ आणि एअरटेल यांनी अलीकडेच मोबाईलच्या रिचार्ज रकमेत वाढ केल्यानंतर सर्वसामान्य लोक बी.एस्.एन्.एल्.कडे वळत आहेत. त्यातच आता ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस्) आणि बी.एस्.एन्.एल्. यांनी आपापसांत केलेल्या करारामुळे वरील खासगी दूरसंचार आस्थापनांना फटका बसणार आहे. बी.एस्.एन्.एल्. खेड्यापाड्यांत जलद इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस’ आणि बी.एस्.एन्.एल्. यांच्यात १५ सहस्र कोटी रुपयांचा करार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘टीसीएस्’ आणि बी.एस्.एन्.एल्. हे भारतातील सहस्रावधी खेड्यांमध्ये ‘४-जी’ इंटरनेट सेवा चालू करणार आहेत.
सध्याच्या काळात ‘४-जी’ इंटरनेट सेवेवर जिओ आणि एअरटेल या खासगी आस्थापनांचे वर्चस्व आहे; पण बी.एस्.एन्.एल्. सक्षम झाल्यास या दोन्ही खासगी आस्थापनांना फटका बसणार आहे. टाटा आणि बी.एस्.एन्.एल्. यांच्यातील कराराने भारतातील ‘४-जी’ नेटवर्क सुलभ होईल.