शनिवारवाड्याचे गतवैभव अद्ययावत् तंत्रज्ञानाद्वारे पुढे आणण्यात येणार !
भाजप खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी पाठवणार पुरातत्व विभागाला प्रस्ताव !
पुणे – येथील शनिवारवाड्याचे गतवैभव अद्ययावत् तंत्रज्ञानाद्वारे पुढे आणण्यात येणार आहे. त्यासाठी खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी १५ जुलै या दिवशी शनिवारवाड्याची पहाणी केली. या वेळी ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’चे सचिव आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे, इतिहास अभ्यासक मोहन शेट्ये, लेखक आणि इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे, वास्तूविशारद प्रचित कलमदाणी आदी उपस्थित होते. त्याविषयीचा प्रस्ताव सौ. कुलकर्णी या पुरातत्व विभाग आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग यांना सादर करणार आहेत, तसेच शनिवारवाड्यात साचलेला कचरा, प्लास्टिक बाटल्यांच्या वापराविषयी सौ. कुलकर्णी यांनी प्रशासनाला खडसावून तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
कुलकर्णी म्हणाल्या की, शनिवारवाड्याची डागडुजी करण्यापासून ते दुर्मिळ चित्र, त्या वेळेचे वृक्ष, फुलझाडे पुन्हा कसे लावता येतील ? ‘होलोग्राम’द्वारे शनिवारवाड्याचे दृकश्राव्य चित्र दाखवणे यांसारखी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुरेसा निधी, विविध अनुमत्यांची आवश्यकता आहे. त्याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करून पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल.