विठ्ठलाचे निजस्थान : श्री क्षेत्र नंदवाळ (जिल्हा कोल्हापूर) !
आज असलेल्या ‘देवशयनी एकादशी’च्या निमित्ताने…
‘दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले क्षेत्र, म्हणजे करवीर काशी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून अवघ्या देशात प्रसिद्ध ! जिथे माता महालक्ष्मीचे कोल्हापूरला वास्तव्य, तसेच येथूनच १० किलोमीटर अंतरावर नंदवाळ हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. जे आधी नंदग्राम नंतर नंदापूर आणि आज नंदवाळ अशी ख्याती आहे. तेथे विठ्ठलाचे देवस्थान अतिशय प्राचीन आणि जागृत आहे. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून राई (सत्यभामा), रखुमाई आणि श्री विठ्ठल अशा ३ मूर्ती एकत्र असल्याने हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. मूळ मंदिर अतिशय प्राचीन हेमाडपंथी आहे आणि या मंदिराला अनेक शतकांचा इतिहास आहे.
नंदवाळमध्ये रात्री विठ्ठल भगवंत मुक्कामी असतात. सकाळी पंढरपूरला जातात, अशी ख्याती आहे. गावाची लोकसंख्या अनुमाने अडीच सहस्र आहे. महाराष्ट्र शासनाने गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये काही कामे शेष आहेत. त्यामध्ये गायमुख विकास, रस्ते सोयी-सुविधा यांचा समावेश आहे. आषाढी एकादशीला या क्षेत्री ४ ते ५ लाख भाविक येतात. सगळा परिसर, गाव भाविकांनी ओसंडून गेलेला असतो. अवघा महाराष्ट्र नंदवाळला येतो, याचे एकच कारण की, तेथे देवाचे अनंत वास्तव्य आहे. ही शक्ती-भक्ती भक्तांना ओढून या ठिकाणी नेत असते. ती शक्ती नंदापूर (नंदवाळ) येथे आहे.
१. ३२ युगांपासून श्री विठ्ठल या ठिकाणी आहे !
खर्या अर्थाने हे आजकालचे वास्तव्य नाही, तर ३२ युगे झाली पांडुरंग नंदापूर नगरीत आहे. याचा पुरावा म्हणजे ज्या वेळी नव्हते पंढरपूर, त्या वेळी होते नंदापूर. पंढरीला जे बघायला मिळते तेच येथे आहे. जशी चंद्रभागा नदी, तशी भीमा नदी (भीमाशंकर येथील गुप्त नदी) येथे स्वयंभू पिंड असून त्याच्या शेजारी आज तलाव आहे. या पिंडीला कान लावताच पाण्याचे नाद ऐकू येतात. श्री विठ्ठलाच्या समोरच गावाच्या मध्यभागी पुंडलिकाचे मंदिर आहे. हे हेमाडपंथी प्राचीन काळातील मंदिर असून पंढरपूरप्रमाणे येथे गायमुख आहे. त्याच्यासमोर गोपाळपूर म्हणजेच गोपाळ कृष्ण मंदिर, ज्या ठिकाणी भगवान कृष्ण गायी राखण्यासाठी आले होते. मंदिरात तीच मूर्ती, गदा-चक्रधर स्वामींची मूर्ती विठ्ठलाच्या गाभार्यात आहे. अशी मूर्ती पंढरपूर आणि नंदवाळ सोडून कुठेही दिसत नाही. याखेरीज ‘करवीर महात्म्य’ ग्रंथात याचा पुरावा नंदग्राम इतिहास, खंड २०, पान क्रमांक ११७ वर आहे.
२. अनुपम असा रिंगण सोहळा !
आषाढी एकादशीला येथे दिंडी सोहळा होतो. सहस्रो भाविकांची दिंडी जी आषाढी एकादशीच्या पूर्वी श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराची प्रदक्षिणा करून नंदवाळकडे रवाना होते.
याचा रिंगण सोहळा दुपारी १२ ते १ या कालावधीत पुईखडी येथे अश्वाच्या (घोड्याच्या) साक्षीने आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. या दिंडीमध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारी पंचक्रोशीतील भजनी मंडळे आणि भाविक सामील होतात. आषाढी एकादशीचा उपवास संपूर्ण गाव करतो. सगळ्यांच्या घरी भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा, खिचडी, राजगिरा, लाडू इत्यादी प्रसाद असतो. राधानगरी ते नंदवाळ आणि कोल्हापूर ते नंदवाळकडे येणार्या दिंड्यांना प्रसादाचे वाटप ठिकठिकाणी सेवा म्हणून केलेले असते. भगव्या पताका, तुळशी वृंदावन, टाळ-मृदंगाचा ठेका, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि देहभान विसरून तल्लीन झालेला वारकरी नंदवाळ येथे दाखल होतो.
‘जय जय रामकृष्ण हरि’, ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ आणि जागोजागी महिलांच्या चालू असलेल्या फुगड्या, तसेच पांडुरंगाच्या भजनात नंदवाळ येथे आषाढी एकादशीचा सगुण सोहळा साकारला जात असतो. भक्ती आणि चैतन्य यांचे तेज, लाखो भाविकांच्या साक्षीने अन् कोल्हापूरहून निघालेल्या पालखी सोहळ्याने आषाढी एकादशीला या सोहळ्याने वेगळीच उंची गाठली आहे. अवघा नंदवाळ आणि पंचक्रोशी रात्रीपासून पहाटेपर्यंत कीर्तन-भजनाने विठ्ठलमय बनते.’
(संदर्भ – ‘श्री करवीर महात्म्य’ या ग्रंथातून (नंदग्राम इतिहास, खंड २०, पान क्रमांक ११७))
संकलक – ह.भ.प. तानाजी निकम (लेखक, योगशिक्षक), नंदवाळ, जिल्हा कोल्हापूर.
‘श्री करवीर क्षेत्र प्राचीन आहे. श्री करवीर क्षेत्राचे महात्म्य श्रीविष्णूंनी ब्रह्मदेवास कथन केले. ब्रह्मदेवांनी नारदास सांगितले आणि नारदांनी त्यांचा प्राणप्रिय सखा मार्कंडेय ऋषि यांस कथन केले. दक्षिण काशीची (करवीर) क्षेत्र प्रदक्षिणा करतांना सर्वांत महत्त्वाचे ठिकाण नंदवाळ (नंदग्राम) हे आहे. अगस्ती मुनी लोपामुद्रेसह या ठिकाणी आले आणि रुक्मिणी, सत्यभामा (राई) समवेत असलेल्या विठ्ठलाचे त्यांनी दर्शन घेतले. त्या वेळी अगस्तींनी लोपामुद्रेस या क्षेत्राचे वर्णन करून सांगितले आहे.
‘कलियुग चालू झाल्यावर श्रीविष्णूंनी आपल्या उदरी पुत्ररूपाने अवतार घ्यावा आणि या अवतारी पुरुषांनी श्रुतीचा अर्थ पुराणादी इतिहासरूपाने प्रकट करावा’, या हेतूने श्री पराशर ऋषींनी करवीर येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या सान्निध्यात राहून उग्र तपश्चर्या केली. महालक्ष्मीच्या प्रसादाने त्यांस पुत्ररत्न लाभले. तेच श्री व्यासमुनी होत. व्यासांनी पुढे भागवतादी पुराणांची रचना केली. त्यापैकी पद्मपुराण हे एक होय. त्यातील करवीर खंडात ‘करवीर महात्म्य’ सविस्तर वर्णिले आहे.’ – ह.भ.प. तानाजी निकम