साधकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रचार करतांना सांगितलेली सूत्रे आचरणात आणल्यावर समाजातील व्यक्तींना आलेल्या अनुभूती
१. अनेक दिवसांपासून घरी असलेल्या एका महिलेच्या यजमानांनी नामजप चालू केल्यावर ते कामावर जाऊ लागणे
‘आम्ही प्रचारानिमित्त एका महिलेच्या घरी गेलो होतो. तेथे ‘साधना’ या विषयावर प्रवचन झाले. त्यानंतर त्या महिलेने लगेचच त्यांच्या देवघरातील देवतांच्या मूर्ती आणि चित्रे यांची रचना पालटली. त्या नामजप करू लागल्या. त्यांच्या यजमानांना अर्धांगवायू झाला होता. ते अनेक दिवसांपासून घरीच होते. त्या महिलेच्या यजमानांनी ग्रंथवाचन आणि नामजप चालू केला. काही दिवसानंतर यजमान कामावर जाऊ लागले.’ – सौ. सपना अवधूत, सोलापूर
२. धर्मशिक्षणवर्गात येणार्या एका मुलीने आणि तिच्या आईने नामजप चालू केल्यावर त्या मुलीच्या घर सोडून गेलेल्या भावाने तिला भ्रमणभाष करणे
‘मी धर्मशिक्षणवर्गामध्ये येणार्या एका मुलीला आणि तिच्या आईला भेटले. मी त्यांना नामजप करण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी नामजप चालू केला. काही कारणांमुळे तिचा भाऊ घर सोडून निघून गेला. तो घरातील व्यक्तींच्या संपर्कात नव्हता. ती मुलगी आणि तिची आई अधिक वेळ नामजप करू लागल्या. काही दिवसांनी त्या मुलीच्या भावाने तिला भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मी आनंदी आहे आणि लवकरच घरी येणार आहे.’’ – कु. स्पंदना चन्नापट्टन, सोलापूर
३. ‘मुलगी नामजपादी उपाय करत असल्याने घरात शांत वाटत आहे आणि मुलीमध्ये पालट होत आहेत’, असे धर्मशिक्षणवर्गामध्ये येणार्या एका मुलीच्या आईने सांगणे
‘धर्मशिक्षणवर्गामध्ये येणार्या एका मुलीला घरातील काही अडचणींमुळे बाहेर जाता येत नव्हते, तरीही त्या मुलीने धर्मशिक्षणवर्गाला येण्यास आरंभ केला. त्यानंतर तिने धर्मशिक्षणवर्गाला येण्यासाठी अन्य लोकांना निमंत्रण दिले. तिने भित्तीपत्रके लावणे, अर्पण घेणे, अशा सेवा करण्यास आरंभ केला. त्या मुलीच्या आईला साधिका भेटल्यावर तिच्या आईला आनंद झाला. ‘माझी मुलगी नामजपादी उपाय करत असल्याने आमच्या घरात शांत वाटत आहे आणि माझ्या मुलीमध्ये पालट होत आहेत’, असे त्या महिलेने सांगितले.’ – कु. निशा वाले, सोलापूर
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |