गोवा : ‘किलबिल’ पुस्तकात ‘मराठी’ शब्दाचे ‘स्पेलिंग’ चुकले !

गोवा विधानसभा वृत्त

काँग्रेसचे आमदार कार्लुस परेरा

शिरोडा : गोवा सरकारच्या शिक्षण संचालनालयाने नुकतेच इयत्ता २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी संसाधन साहित्याविषयी ‘किलबिल’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर रोमन लिपीत असलेल्या ‘मराठी’ या शब्दाचे ‘स्पेलिंग’ चुकले आहे. MARTAHI असे स्पेलिंग पुस्तकावर आहे, ते MARATHI, असे हवे होते.

काँग्रेसचे आमदार कार्लुस परेरा यांनी याविषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. लहान मुलांसाठीच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच जर अशा ढोबळ चुका असतील, तर मग तुम्ही……, असे खोचकपणे कार्लुस यांनी शिक्षणमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला.

हे पुस्तक काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले होते. (कुठलेही पुस्तक सिद्ध करतांना त्यासाठी पुस्तक निर्मिती समिती असते. त्यासाठी मुद्रितशोधन करणारे तज्ञ असतात. तरीही जेव्हा अशा ढोबळ चुका रहातात, तेव्हा त्यांना उत्तरदायी ठरवून समितीतून काढून टाकले पाहिजे, असे सर्वसामान्य लोकांना वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)