पंढरपूर येथे ‘भक्तीसागर’ (६५ एकर), वाळवंट, पत्राशेड, दर्शन रांगेची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पहाणी !
मुख्यमंत्र्यांनी वारकर्यांशी साधला संवाद !मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्राशेड येथील दर्शन रांगेत वारकरी भक्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वारकर्यांनी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाविषयी समाधान व्यक्त केले. ‘पंढरपूर येथे वारकरी भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत, हे पाहून समाधान वाटत आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. |
सोलापूर, १५ जुलै (वार्ता.) – आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. या सोहळ्यासाठी येणार्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध सिद्धता करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारी कालावधीत प्रशासनाकडून देण्यात येणार्या सोयी-सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी केली.
१. या वेळी त्यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, आमदार समाधान आवताडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
२. येणार्या भाविकांसाठी मंदिर समिती आणि प्रशासन यांच्या वतीने दर्शन रांगेत देण्यात येणार्या मॅट, स्वच्छ पाणी, आरोग्य, शौचालये आदी सुविधा, तसेच महिला भाविकांसाठी देण्यात येणार्या सुविधा, तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नान केल्यानंतर महिलांना कपडे पालटण्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या ‘चेंजिंग रूम’ची, तसेच शौचालयांचीही पहाणी मुख्यमंत्र्यांनी केली.
३. यावर्षीची आषाढी वारी अतिशय नियोजनबद्ध झाली पाहिजे, वारकरी संप्रदायाची गैरसोय, अडचण होता कामा नये, दर्शन रांगेमध्ये भाविकांना त्रास होऊ नये; म्हणून मंदिर समितीच्या वतीने भक्तीसागर, वाळवंट, पत्राशेड, दर्शन रांगेत देण्यात आलेल्या सोयीसुविधांची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.