पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्. बसमुळे ६ महिन्यांत ३४ अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू !

ठेकेदारांच्या बसने होणार्‍या अपघातांचे प्रमाण अधिक !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (पुणे) – पी.एम्.पी.एम्.एल्. (पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित) बसच्या अपघातामध्ये चालू वर्षात जानेवारी ते जून या ६ महिन्यांत ३४ अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण अपघातात ठेकेदारांच्या बसच्या अपघाताचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये खात्याच्या बसने ९, तर ठेकेदारांच्या बसमुळे २५ अपघात झाले आहेत. पी.एम्.पी.कडून पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच लगतच्या ग्रामीण भागातही बस सेवा पुरवली जातो. या बसचे किरकोळ, तसेच मोठे अपघात होत आहेत.

अनेकदा अरुंद रस्ते, वाहतूककोंडी, रस्त्यालगत असलेले वाहनतळ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन या कारणांमुळे अपघात होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते; मात्र पी.एम्.पी. बसच्या चालकाला गर्दीत वाहन चालवण्याच्या अनुभवाचा अभाव, बसवरील नियंत्रण सुटणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, यांमुळेही अपघात होत असल्याचे समोर येते.

या संदर्भात पी.एम्.पी.एम्.एल्.चे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांनी सांगितले की, ६ महिन्यांतील ३४ अपघातांत ११ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर घायाळ झाले आहेत. यासह १० जण किरकोळ घायाळ झाले आहेत. वाहनचालकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. सुरक्षितरित्या वाहन चालवण्यासह प्रवाशांची काळजी घेण्याविषयी सूचना दिल्या जात असतात. यासह बसच्या देखभाल-दुरुस्तीकडे अधिक लक्ष दिले जात असते. (अधिकार्‍यांनी केवळ अपघातांची माहिती न देता ते होऊ नयेत; म्हणून काय उपाययोजना करणार, ते सांगितले पाहिजे. – संपादक)