दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ‘कॅमलिन’चे दांडेकर यांचे निधन !; मशिपूर (धुळे) येथे दुचाकीची महिलेला जोरदार धडक !…

‘कॅमलिन’चे दांडेकर यांचे निधन !

मुंबई – ‘कॅमलिन’ या सुप्रसिद्ध आस्थापनाचे माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे १५ जुलै या दिवशी पहाटे निधन झाले. अनेक मराठी उद्योजकांना त्यांनी बळ दिले आणि सहस्रो मराठी तरुणांना नोकर्‍या दिल्या. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. रंगाच्या साम्राज्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या उद्योग जगतात आधारवड हरपल्याची भावना आहे. आद्य मराठी उद्योजक दांडेकर यांनी भारतीय कलाकाराला उत्तम स्वदेशी कलासाहित्य उपलब्ध करून दिले.


मशिपूर (धुळे) येथे दुचाकीची महिलेला जोरदार धडक !

धुळे – मशिपूर तालुक्यातील करवंद नाका येथे भरधाव दुचाकीने रस्त्यावरून पतीसह पायी चालणार्‍या एका महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत महिला फूटबॉलप्रमाणे हवेमध्ये उडून काही अंतरावर जाऊन पडली. ही महिला घायाळ झाली आहे. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहेत.


मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू !

मुंबई – मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बाबळे फाट्याजवळ दुचाकीला अवजड वाहनाने धडक दिली. त्यानंतर वाहनचालकाने पळ काढला. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर घायाळ झाला आहे.


गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नी ठार !

अकोला – रेल्वेस्थानक आणि सिंधी कँप उड्डाणपुलावरून एक दांपत्य दुचाकीने क्रिकेट क्लब मैदान ते जेल चौक रस्त्यावरील उड्डाणपुलावर जात असतांना एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पत्नीचा मृत्यू झाला असून पती घायाळ आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला; मात्र घटनास्थळावर कारची वाहन क्रमांकाची पाटी तुटून पडल्यामुळे चालकाची ओळख पटवणे पोलिसांना सहज शक्य झाले.

संपादकीय भूमिका : पोलिसांचे कुचकामी सापळे !


पोलीस ठाण्यातून पळालेल्या संशयिताला पकडले !

नंदुरबार – शहर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात चौकशीसाठी संशयित आरोपीला आणले होते. त्याने तेथून अचानक पळ काढला. पोलिसांनी चित्रपटात दाखवत असल्याप्रमाणे पाठलाग करून त्याला पकडले. याचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला. पोलीस त्याला पकडतांना दमले.


कोकणात अडकलेल्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या जादा गाड्या !

मुंबई – कोकणात १३ आणि १४ जुलै या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे गेल्या १० घंट्यांहून अधिक काळ ठप्प होती. अनेक प्रवासी गाडीची वाट पहात खोळंबले होते. रत्नागिरी येथून प्रवशांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या २५ बसगाड्यांची सोय करण्यात आली. त्यानंतरही रत्नागिरी रेल्वेस्थानकावर शेकडो प्रवासी बसच्या प्रतीक्षेत होते. वृद्ध, अपंग, आजारी प्रवाशांसाठी ‘स्लिपर बसगाडी’ची सोय करण्यात आली.