भारतावरील मुसलमानांचे आक्रमण आणि काँग्रेस, तसेच साम्यवादी मनोवृत्ती !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका, हिंदुस्थान आणि राजसत्ता, भारतातील हिंदु आणि मुसलमान ही २ राष्ट्रे नसल्याचे (अ)ज्ञान, हिंदु-मुस्लिम ऐक्य हे गांधींच्या जीवनाचे साध्य होते, गांधी आणि बॅ. जीना यांच्या विचारांचे सार अन् अखंड भारतातील द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आजही देशाला भोवणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (लेखांक २२)

या पूर्वीचा लेख आपण येथे वाचू शकता : https://sanatanprabhat.org/marathi/813038.html

प्रकरण ४

पू. प्रा. सुरेश.ग. शेवडे

६. स्वाभिमानी सत्तेने देशावर राज्य केल्यास काय झाले असते ? 

एखादी स्वाभिमानी सत्ता फाळणीनंतर या देशावर राज्य करणार असती, तर तिने तेव्हाच मुसलमान आक्रमकांच्या विध्वंसाच्या खुणा पुसून टाकल्या असत्या. सोमनाथाच्या मंदिराची पुनर्बांधणी करून सरदार वल्लभभाई पटेल यांनी आदर्श उत्पन्न केला होता. रामजन्मभूमी, मथुरेची कृष्णजन्मभूमी, काशीचे विश्वेश्वर मंदिर या प्रमुख स्थानांची तात्काळ नवी उभारणी झाली असती. अहमदाबाद, औरंगाबाद, एदलाबाद, अहमदनगर, हैदराबाद, सिकंदराबाद, अकबर रोड, मुघल गार्डन्स इत्यादी नावे तात्काळ पालटली असती. गोव्यातीलही अस्नोड्याचे पुन्हा असुर्डे झाले असते. वास्को, बिचोलीम् इत्यादी नावे सुधारली असती. भारताचा इतिहास अभ्यासून स्वकीय विद्वानांकडून तो शुद्ध करून घेता आला असता. इतिहास संशोधक मंडळे समृद्धपणे कामे करू लागली असती. ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला विरोध करण्याचे कुणाचेच धाडस झाले नसते. आमची जी देवालये आपली पराभूत भग्नमूर्तीची शिल्पे अपमान गिळून जगाला दाखवत आहेत, ती एकतर नव्या मूर्ती बनवून किंवा पाडून पुनश्च नव्या शिल्पांनी बहरली असती; परंतु तेवढे आमचे भाग्य कुठले ?

७. हिंदूंचा देश दुर्दैवाने निधर्मी !

हिंदूंचे हेच दुर्दैव आहे की, भारत हा अधिकृतपणे हिंदूंचा देश असला, तरी त्याच्याच राज्यघटनेने त्याला निधर्मी, सर्वधर्मसमभावी आणि सेक्युलर ठरवले आहे. धर्म हा हिंदूंचा आणि हिंदुस्थानचा प्राण आहे. ‘आपण सेक्युलॅरिझम् स्वीकारला आहे’, असे आम्हाला सतत सांगितले जाते. कुणी स्वीकारला ? स्वराज्यासाठी आत्मबलीदान करणार्‍या क्रांतीकारकांना स्वतःचा देश हवा होता कि धर्मशाळा हवी होती ?

– भारताचार्य, धर्मभूषण पू. प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

(क्रमश:)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक का : https://sanatanprabhat.org/marathi/816470.html