ट्रकची धडक चुकवतांना तरुण वैतरणा नदीत पडला !
पालघर – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेस गावाच्या हद्दीत वाहतूककोंडी झाली होती. वाहतूककोंडीचे कारण जाणून घेण्यासाठी एका चारचाकीतील कैलास मढवे आणि त्याचा एक मित्र कारमधून बाहेर पडले अन् राष्ट्रीय महामार्गावरून दुर्वेस परिसरातून मस्तान नाक्याच्या दिशेने पायी चालत निघाले. चालत चालत राष्ट्रीय महामार्गावरील वैतरणा नदी पुलावर ते पोचले. या वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसेल आणि अपघात होईल या भीतीने कैलास मढवे याने पुलाच्या कठड्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला; मात्र भरधाव वेगातील ट्रकची धडक चुकवण्याच्या नादात तो वैतरणा नदीपात्रात पडला. तो चिंचणी गावचा रहिवासी होता. नदीपात्रात वाहून गेलेल्या कैलासचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.