राज्यात मुसळधार पाऊस !
मुंबई – राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. कोकणात तर पावसाने धुमशान घातला असून रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. कोकणाच्या दिशेने जाणार्या आणि येणार्या अनेक गाड्या रहित करण्यात आल्या आहेत. नदी-नाले तुडुंब भरून वहात आहेत, पूरसदृश स्थिती असल्याने प्रशासन सतर्क आहे.
मुंबई – येथे मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे. दुपारनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मुंबईला ‘रेड अलर्ट’ (अतीवृष्टीची इशारा) देण्यात आला आहे.
पुढील २४ घंट्यांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. या काळात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० अंश से. आणि २५ अंश से. आसपास असेल.
मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण या व्यतिरिक्त मराठवाडा आणि विदर्भ येथील बहुतांश भागांत पावसाची चेतावणी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी धाराशिवमध्ये काही ठिकाणी पावसाची चेतावणी देण्यात आली आहे, तर विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोल्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.