संतांनी सांगितलेला नामजप आणि शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर घराच्या विक्रीच्या प्रक्रियेत येणारी अडचण दूर होणे
‘आमचे पुण्यातील घर विकायचे होते. घराच्या विक्रीच्या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात सोसायटीकडून ‘ना हरकत’ दाखला मिळण्यास पुष्कळ विलंब होऊन अडचणी येत होत्या. सोसायटीचे अधिवक्ता परगावी गेल्याने त्यांचा समुपदेश (सल्ला) मिळत नव्हता. त्या वेळी ‘सद्गुरु सत्यवान कदम यांना विक्रीच्या प्रक्रियेतील अडथळे दूर होण्यासाठी नामजप विचारावा’, असे देवाने मला सुचवले. त्यांनी सांगितलेला जप आम्ही घरातील सर्वांनी लगेच चालू केला. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘घराच्या विक्रीसंदर्भात अडचण येत आहे’, असा संदेश पाठवला आणि त्यांना शरण जाऊन ‘ही अडचण तुम्हीच सोडवू शकता’, अशी प्रार्थना केली. नंतर सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी ‘फेसबुक’वर अधिवक्त्यांच्या नावावरून त्यांचा शोध घेतला. तेव्हा ते अधिवक्ता एका साधिकेचा मुलगा असल्याचे समजले. आम्ही त्या साधिकेशी संपर्क केला. त्यानंतर जलद गतीने सर्व प्रक्रिया होऊन त्याच दिवशी (नामजप चालू केल्याच्या दिवशी) सायंकाळपर्यंत आम्हाला ‘ना हरकत’ दाखला मिळाला. नंतर परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे आरंभी नकारात्मक असलेले सोसायटीचे सचिवही पुष्कळ सकारात्मक झाले.
परात्पर गुरु डॉक्टरांना ही अनुभूती सांगितल्यावर ‘‘तुमचा भाव असल्याने देव साहाय्य करतो’’, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात सर्व काही सुचवणारे, करवून घेणारे आणि सद्गुरूंच्या माध्यमातून प्रक्रिया घडवून आणणारे परात्पर गुरु डॉक्टरच होते.
परात्पर गुरु डॉक्टर, साधनेत, तसेच वैयक्तिक जीवनात तुमची कृपा आम्ही सतत अनुभवत आहोत. गेल्या अनेक जन्मांत आणि या जन्मातील आमचा योगक्षेम तुम्हीच वहात आहात. आमची साधना गतीने व्हावी; म्हणून तुम्हीच प्रयत्न करत आहात. ‘परात्पर गुरु डॉक्टर, आम्ही साधनेच्या प्रयत्नांत पुष्कळ अल्प पडत आहोत. तुम्हीच तुम्हाला अपेक्षित असे प्रयत्न आमच्याकडून करून घ्या’, अशी तुमच्या चरणी संपूर्ण शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– श्री. नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. निरंजन दाते, पुणे
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |