ऑनलाईन मागणी नोंदवून आणि पैसे देऊनही खाद्यपदार्थाचे वितरण न केल्याने ग्राहकाला ६० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश
कर्नाटक ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा ‘झोमॅटो’ला दणका
धारवाड (कर्नाटक) – येथे ‘झोमॅटो’वर ‘मोमोज’ (एक प्रकारचा खाद्यपदार्थ) मागणी करूनही त्याचे वितरण न झाल्याने एका महिलेने कर्नाटक ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर एका वर्षाने ग्राहक आयोगाने झोमॅटोला संबंधित महिलेला ६० सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.
या महिलेने ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी महिलेने झोमॅटोकडे मोमोज पुरवण्याची ऑनलाईन मागणी नोंदवली होती. त्यासाठी १३३ रुपये ऑनलाईन सुविधेद्वारे भरले होते. मागणी नोंदवल्यानंतर १५ ते २० मिनिटांमध्ये पदार्थाचे वितरण होणे अपेक्षित होते; मात्र पदार्थ मिळालाच नाही. याची तक्रार झोमॅटोकडे करण्यात आल्यावर त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर या महिलेने १३ सप्टेंबर २०२३ या दिवशी कर्नाटक ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.