व्याख्यानमालेतील वक्त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचच्या वतीने सन्मान !
केडगाव येथे स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमाला !
केडगाव (जिल्हा पुणे), १५ जुलै (वार्ता.) – केडगाव तालुका दौंड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचच्या स्थापनेस गुरुपौर्णिमेस २४ वर्षे पूर्ण होत आहेत. द्वितपपूर्ती निमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयक महिन्यातील प्रत्येक एकादशीला अशी महिन्यात २ म्हणजे वर्षात २४ अशी ऑनलाईन व्याख्याने घेण्याचे आयोजन मंचच्या वतीने करण्यात आले होते. सावरकरांचे स्मरण होऊन त्यांचे बालपण, जडणघडण, कार्याचा परिचय, तसेच त्यांचे हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राचा विचार सर्वांपर्यंत पोचून त्यातून कार्याची दिशा मिळावी या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवर वक्त्यांचे या व्याख्यानमालेत मार्गदर्शन झाले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांचेही व्याख्यान ठेवण्यात आले होते. मान्यवर वक्त्यांचा सन्मान करण्यासाठी १४ जुलै या दिवशी केडगाव येथील बोरमलनाथ मंदिर सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. सुनील घनवट आणि श्री. पराग गोखले यांच्या वतीने प्रा. श्रीकांत बोराटे यांनी सन्मान स्वीकारला. कार्यक्रमाचा आरंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. या वेळी शिवचरित्राचे व्याख्याते श्री. गणेश धालपे, धर्मवीरगडाचे सेवेकरी आणि व्याख्याते श्री. लक्ष्मण नाईकवाडी, समर्थ मंडळ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक श्री. टेंगले सर, श्री. अभिषेक परदेशी, ज्येष्ठ नागरिक श्री. विठ्ठल कोरपड, हिंदु जनजागृती समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंचचे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दयानंद बंडगर, तर आभार श्री. शुभम लव्हे यांनी केले.