परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘संतांशी कसे वागावे ?’, हे प्रत्यक्ष कृतीतून शिकवलेले काही प्रसंग !
२१ जुलै २०२४ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…
‘औषधोपचारासाठी वैद्य, न्यायालयीन कामासाठी वकील, तांत्रिक कामासाठी अभियंता लागतात, तसे ईश्वरप्राप्तीसाठी गुरु आवश्यक असतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. ‘संतांचा अभ्यास कसा करावा ? आणि त्यांच्यामधील संतत्व कसे पहावे ?’ हे प्रत्यक्ष कृतीतून शिकवणे
१ अ. एक संत अत्यंत मोठ्या आवाजात टीकास्पद बोलत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना सेवाकेंद्रात रहायला येण्याचा आग्रह करणे : ‘वर्ष २००० ते वर्ष २००५ या कालावधीत सुखसागर, फोंडा (गोवा) येथे सनातनचे सेवाकेंद्र होते. आम्ही सेवाकेंद्रात गेल्यानंतर २ – ३ मासांतच सकाळच्या वेळी अकस्मात् एक वृद्ध संत तेथे आले. त्यांच्या समवेत त्यांचे एक सेवक होते. ते संत स्वागतकक्षाच्या खोलीत येऊन मोठ्याने बोलत होते. ते संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे असावेत. ते प.पू. डॉक्टरांना एकेरी नावाने हाक मारत होते. ‘कुठे आहे जयंता ?’, असे मोठ्याने ओरडत होते आणि प.पू. डॉक्टरांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करत होते. हा सर्व आवाज ऐकून आम्ही आमच्या खोलीतून स्वागतकक्षात गेलो. आमच्या पाठोपाठ प.पू. डॉक्टरही त्यांच्या खोलीतून बाहेर आले. ते संत अत्यंत मोठ्या आवाजात टीकास्पद बोलत होते. ते ऐकूनही प.पू. डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘या. बसा. तुम्ही हवे, तर आमच्याकडे कायमचेच रहा. तुम्हाला एक खोली देतो.’’ प.पू. डॉक्टर त्यांना असे परत परत सांगत होते. काही वेळ गेल्यानंतर ते संत तसेच निघून गेले.
१ आ. पराकोटीचा क्रोध व्यक्त करूनही ‘संतांनी शाप दिला नाही’, असे सांगून प.पू. डॉक्टरांनी ‘त्या संतांविषयी साधकांच्या मनात विकल्प निर्माण होऊ नये’, याची काळजी घेणे : ते संत निघून गेल्यानंतर प.पू. डॉक्टर म्हणाले,‘‘बघा, संत कसे असतात ! त्यांना इतका राग आला होता, तरीही त्यांनी शाप दिला नाही.’’ त्या वेळी मला प.पू. डॉक्टरांच्या या बोलण्याचे आश्चर्य वाटले. यातून आम्हाला ‘संतांचा अभ्यास कसा करावा ? आणि त्यांच्यामधील संतत्व कसे पहावे ?’, याचा एक वेगळा पैलू शिकायला मिळाला. या वेळी प.पू. डॉक्टरांनी ‘आमच्यासारख्या नवशिक्यांच्या मनात त्या संतांविषयी काही विकल्प निर्माण होऊ नये’, याची काळजी घेतली, हेही पहायला मिळाले. या संतांविषयी प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) सांगलीतील एका भक्तांनी त्यांनी स्वत: पाहिलेला प्रसंग मला सांगितला होता. त्याचे सार येथे उद्बोधक ठरेल. हे वृद्ध संत प.पू. बाबांकडे ‘तुम्ही जयंता मला द्या’, अशी मागणी करत होते आणि त्यावर प.पू. बाबा ‘तुम्हाला अमूक दोन शिष्य दिले आहेत’, असे सांगून त्यांचे म्हणणे खोडून काढायचे.
२. जाहीर सभेमध्ये अकस्मात् एक संत आल्यावर प.पू. डॉक्टरांनी स्वत:चे बोलणे थांबवून त्यांनाच मार्गदर्शन करण्याची विनंती करणे
वर्ष १९९६ मध्ये प.पू. डॉक्टर जाहीर सभा घेत असत. या जाहीर सभांतून ते साधनेविषयी सांगत असत. जाहीर सभेचे पूर्ण नियोजन साधकच करत असत. वाई (जिल्हा सातारा) येथे जाहीर सभा घ्यायची ठरल्यावर मी प.पू. डॉक्टरांना ‘आसपास कुणी प्रमुख संत आहेत का ? त्यांना सभेसाठी बोलवायचे का ?’, असे विचारले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी प.पू. आबानंद महाराज यांचे नाव सांगितले. प.पू. डॉक्टरांनी साधनेला आरंभ केला, तेव्हा त्यांनी प.पू. आबानंद महाराज यांच्या समवेत काही अध्यात्मशास्त्रीय प्रयोग केले होते. प.पू. आबानंद महाराज हे प.पू. गगनगिरी महाराज यांचे शिष्य. ते वाईपासून थोडे दूर डोंगरावर एका दुर्गम ठिकाणी रहात होते. त्यांचा पत्ता घेऊन आम्ही तेथे जाऊन त्यांना सभेसाठी निमंत्रित केले. प.पू. आबानंद महाराज यांनी ‘ते येणार कि नाही ?’, याविषयी काही स्पष्ट सांगितले नाही. एकूण त्यांच्या बोलण्यावरून ‘ते येण्याची शक्यता नाही’, असेच आम्हाला वाटले. वाई येथील जाहीर सभा चालू झाली. सायंकाळचे ७ – ७.३० झाले असतील. सर्वत्र अंधार झाला होता आणि अकस्मात् ‘प.पू. आबानंद महाराज सभास्थानी पोचले’, असे आम्हाला समजले. आम्ही व्यासपिठावर जाऊन प.पू. डॉक्टरांना ‘प.पू. आबानंद महाराज सभास्थानी आले आहेत, तर त्यांची बसण्याची व्यवस्था कुठे करायची ?’, असे विचारले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘आणखी एक आसंदी आणा आणि त्यांची बसण्याची व्यवस्था व्यासपिठावरच करा.’’ आम्ही त्याप्रमाणे केले. प.पू. आबानंद महाराज व्यासपिठावर जाऊन बसले. ते व्यासपिठावर जाताक्षणी प.पू. डॉक्टरांनी आपले मार्गदर्शन बंद केले आणि उपस्थितांना प.पू. आबानंद महाराज यांचा परिचय करून दिला. त्यानंतर त्यांनी प.पू. आबानंद महाराजांना ‘तुम्ही या सभेला मार्गदर्शन करा; कारण तुम्ही संत आहात’, अशी विनंती केली. प.पू. डॉक्टरांनी उपस्थितांना सांगितले, ‘‘आपण संतांचे मार्गदर्शन घ्यायचे असते. त्यामुळे मी प.पू. आबानंद महाराज यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रार्थना करत आहे.’’ प.पू. आबानंद महाराज १ – २ वाक्ये बोलले आणि त्यांनी प.पू. डॉक्टरांना सांगितले, ‘‘तुम्हीच मार्गदर्शन करा.’’ या प्रसंगातून प.पू. डॉक्टरांनी ‘संतांशी कसे वागावे ?’, हे प्रत्यक्ष स्वत:च्या कृतीतून शिकवले.’
– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत. सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०२४)