कुठे चालली आहे आजची तरुण पिढी ?
गेल्या १ ते दीड महिन्यापासून पुणे, जळगाव, नागपूर, वरळी (मुंबई) येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याने अनेकांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. या घटनांनंतरही चालकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. त्यासाठी अनेक पळवाटा शोधल्या जातात. अपघात करणारा जर श्रीमंत असेल किंवा एखाद्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तीशी संबंधित असेल, तर ते प्रकरण मिटवण्याचा आटापिटा केला जातो. आतापर्यंत अपघात झालेल्यांपैकी काही वाहनांमध्ये नशायुक्त पदार्थही आढळले होते. काही जण आधी पबमध्ये जाऊन मद्यपान करतात, नंतर वाहन चालवतात. त्यातच त्यांच्याकडून अपघात होतो. यासंदर्भातील बर्याचशा गोष्टी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या माध्यमातूनही समोर येतात. अशा स्वरूपाच्या अपघातांमध्ये अनेक निरपराध्यांचा मृत्यू झाला. वरळी येथेही अशाच स्वरूपाच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. हे सर्व पाहिल्यावर प्रश्न पडतो, ‘कुठे चालली आहे आजची तरुण पिढी ?’
१. बार किंवा पब यांच्याकडून नियमांचे उल्लंघन !
बार किंवा पब यांच्यासाठी रात्री १ वाजताची वेळमर्यादा ठरवून दिलेली असतांनाही त्यानंतर अनेकांना प्रवेश दिला जातो. त्यात १८ वर्षांखालील अल्पवयीन मुले-मुली असतात. तेथे जाऊन मद्यपान करून बाहेर पडल्यावरच अपघात किंवा अत्याचार यांच्या घटना घडतात. आता तर मोठमोठ्या शहरांमध्ये पब, बार क्लब, लॉऊंज (एखाद्या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी असलेली खोली), रूफटॉप रेस्टॉरंट (छतावरील उपाहारगृह) यांच्यावरही कारवाई चालू झाली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या आदेशानुसार पुण्यात १८९ पब आणि बार यांच्यावर कारवाई करण्यात आली असून अनेकांचे परमिट (परवाने) रहित करण्यात आले आहेत.
२. मुले काय करतात, याकडे पालकांचे लक्ष हवे !
शिक्षणासाठी अनेक मुले राज्यातून किंवा परराज्यातून लाखोंच्या संख्येने पुण्यात येतात. पुणे शहरही आता उद्योगधंदे आणि आस्थापने यांचे मोठे क्षेत्र झाले आहे. तेथे पुष्कळ वेळ काम करावे लागत असल्याने मुलांना मानसिक ताण येतो. तो दूर करण्यासाठी मुले वरील स्वरूपाचे पर्याय निवडतात. आठवड्याच्या शेवटी म्हणजे सुटीच्या दिवशी हे सर्व पर्याय वापरणे, म्हणजे एक प्रकारे व्यसनाधीन होणेच आहे. तसे केल्याविना त्यांना चैन पडत नाही. काही ठिकाणी दारूसमवेत अमली पदार्थांचेही सेवन केले जाते. नाच-गाण्याचेही प्रकार होतात. बर्याच ठिकाणी पब किंवा बार पहाटेपर्यंत चालू असतात. तेथे मुलीही धूम्रपान आणि मद्यपान करतात. आपला मुलगा किंवा मुलगी काय करते, याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. सगळ्याच संदर्भात पोलिसांना दोष देऊन चालणार नाही.
३. आई-वडिलांकडून मुलांची होणारी पाठराखण धोकादायक !
मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशक आरती पेंडसे म्हणतात, ‘‘पालटलेली जीवनशैली, उच्चभ्रू रहाणीमान, ‘पब’ संस्कृती, ‘गर्लफ्रेंड’ (प्रेयसी) किंवा ‘बॉयफ्रेंड’ (प्रियकर) आदी गोष्टींनाच मॉडर्न (आधुनिक) समजणे यांमुळे आपल्या कुटुंबसंस्थेची अवस्था भयानक झाली आहे. एकमेकांमधील संवाद न्यून झाला आहे. ‘मुलगा दारूची पार्टी करतो, मुलगी तिच्या मित्रांसमवेत रात्री-अपरात्री बाहेर फिरते’, हे सांगण्यात पालकांनाच धन्यता वाटत असेल, तर मुलांना दोष कशाला द्यायचा ? ‘मी कसाही वागलो किंवा वागले, तरी माझे आई-वडील मला वाचवायला येणारच आहेत’, याची निश्चिती असल्याने जीवघेणी थेरं अनुभवण्याची मुलांमध्ये मस्ती येते. जिथे कायदा मोडणे आणि त्यातून सुटणे हे सामर्थ्याचे लक्षण समजले जाते, तिथे अशा घटना घडणारच ! सध्याच्या मुलांमध्ये व्यसनाधीनता आणि किशोरवयातील लैंगिक संबंध यांचे प्रमाण वाढले आहे.
४. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर कि व्यसनांचे आगार ?
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात बार-पब यांच्या विकृतीमुळे, तसेच अमली पदार्थांच्या सेवनाने पुणे असंस्कृत होत आहे. नुकताच पुण्यात एक परिसंवाद झाला. त्याचा विषय होता, ‘पुणे हे शिक्षणाचे माहेरघर कि व्यसनांचे आगार ?’ ‘माणसांच्या जगण्याची जीवनमूल्ये पालटत आहेत. नको त्या गोष्टींनी प्रतिष्ठेची जागा घेतली आहे. असंवेदनशील राजकारणी, भ्रष्ट नोकरशाही आणि आत्ममग्न समाज हेच या अधःपतनाला उत्तरदायी आहेत’, असे विचार प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी मांडले, तर ‘भ्रमणभाषचा वापर कसा आणि कितपत करावा, याविषयी आई-वडीलही अनभिज्ञ आहेत; म्हणूनच मुलांच्या हाती खेळण्यासारखा भ्रमणभाष देतांना ते पुढील परिणामांचा विचार करत नाहीत. त्याचेच रूपांतर पुढे व्यसनात होण्यास वेळ लागत नाही; म्हणून पालकांनीही वेळीच दक्षता घेणे आवश्यक आहे. भ्रमणभाषचा वापर योग्य प्रकारे करणे हे आपल्या हाती आहे’, असा विचार मुक्ता चैतन्य यांनी परिसंवादात मांडला.
५. ‘पब’ ही संस्कृती नव्हे, तर विकृती !
एका मुलाखतीत भाजपच्या खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘पुण्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, तसेच ‘पब’ संस्कृतीचे उच्चाटन केले जाईल. त्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्नशील राहील.’’ समुपदेशक आरती पेंडसे म्हणाल्या, ‘‘पब ही संस्कृती नसून विकृती आहे. संस्कृती म्हणजे मानसिक उन्नतीचा दर्शक असा जीवनक्रम किंवा आदर्श वर्तनपद्धत ! संस्कृती म्हणजे ज्यात ज्ञान, श्रद्धा, कला, नीती, कायदा, रूढी यांचा समावेश होतो. या गोष्टी व्यक्तीने समाजाचा भाग या नात्याने स्वीकारलेल्या असतात.’’
६. तरुण पिढीची वाताहत धोकादायक !
मध्यंतरी सिंहगडाच्या पायथ्याशी अनेक मुला-मुलींना अमली पदार्थांची मेजवानी करतांना पोलिसांनी पकडले. त्या वेळी त्यांचे पालक तेथे येऊन पोलिसांनाच दम देत होते. पालक विचारत होते, ‘‘मुलांनी या वयात या गोष्टी करायच्या नाहीत, तर मग केव्हा करायच्या ?’’ अशा पालकांकडून चांगल्याची काय अपेक्षा करायची ? पालकांनीच जर अशी भूमिका घेतली, तर पब किंवा बार प्रकरण आणि अमली पदार्थांचे सेवन कसे बंद होईल ? तरुण पिढीची अशी वाताहत होणे परवडणारे नाही हे नक्की !
– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जिल्हा जळगाव