मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा दबाव ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते
पालकमंत्र्यांचे मराठ्यांच्या विरोधात षड्यंत्र असल्याचा आरोप !
छत्रपती संभाजीनगर – ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे २-३ पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षड्यंत्र रचत आहेत. विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये; म्हणून इतर मंत्र्यांवर दबाव आणत असल्याची शक्यता आहे’, असा आरोप मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी येथे केला. मनोज जरांगे यांची १३ जुलै या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे शांतता फेरी पार पडली. त्यानंतर दुसर्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
ते म्हणाले की, एक महिन्याची मुदत संपली आहे. आता मी २० जुलैपासून पुन्हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे ‘आमरण उपोषणा’ला बसेन. त्याच दिवशी हे २८८ उमेदवार पाडायचे की, आपले उभे करायचे हे ठरवण्यात येईल. माझ्यासाठी माझा समाज महत्त्वाचा आहे. सरकारला महिन्याभराचा वेळ दिला होता. मराठा समाजाला १३ जुलैपर्यंत आरक्षण मिळाले नाही, हेच आम्हाला दिसत आहे. आमच्याकडे संयम नसता, तर आम्ही मंत्री शंभूराज देसाई यांचा शब्द पाळलाच नसता. आता देवेंद्र फडणवीस करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील, कारण त्यांच्यासाठी मंत्री छगन भुजबळ महत्त्वाचे आहेत. आता आम्हीही आरक्षण कसे मिळवायचे हे पहातो.